वाढीव महिला रुग्णालयासाठी महसूलच्या जागेची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 06:00 AM2019-09-23T06:00:00+5:302019-09-23T06:00:46+5:30
सध्या १०० खाटांच्या रुग्णालयात २५० पेक्षा अधिक गरोदर माता, प्रसूत झालेल्या माता, नवजात बालके व इतर गंभीर आजार असलेली बालके भरती आहेत. त्यामुळे इतर कामासाठी असलेल्या खोल्यांमध्ये खाटा ठेवून गरोदर माता व बालकांना भरती करण्यात आले आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवर सुद्धा कामाचा ताण वाढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली येथे सध्या १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय आहे. शासनाने पुन्हा १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय मंजूर केले आहे. त्यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी सुद्धा उपलब्ध झाला आहे. सदर इमारत बांधण्यासाठी महिला रुग्णालयाजवळ सध्या उपलब्ध असलेल्या जागेबरोबरच महसूल विभागाच्याही जागेची आवश्यकता आहे.
गडचिरोली येथील इंदिरा गांधी चौकात १०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय मागील दोन वर्षांपासून सुरू झाले आहे. या रुग्णालयात संपूर्ण जिल्ह्यातील तसेच नजीकच्या चंद्रपूर जिल्ह्यातीलही गरोदर माता व लहान बालके भरती होतात. परिणामी या रुग्णालयात नेहमीच गर्दी राहते. सध्या १०० खाटांच्या रुग्णालयात २५० पेक्षा अधिक गरोदर माता, प्रसूत झालेल्या माता, नवजात बालके व इतर गंभीर आजार असलेली बालके भरती आहेत. त्यामुळे इतर कामासाठी असलेल्या खोल्यांमध्ये खाटा ठेवून गरोदर माता व बालकांना भरती करण्यात आले आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवर सुद्धा कामाचा ताण वाढला आहे.
ही सर्व परिस्थिती लक्षात घेता पुन्हा १०० खाटांचे रुग्णालय व्हावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार शासनाने १०० खाटांच्या रुग्णालयाला मंजुरी दिली आहे. एनआरएचएम अंतर्गत ३० कोटी रुपयांचा निधी सुद्धा इमारत बांधकामासाठी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून सध्या अस्तित्वात असलेल्या महिला व बाल रुग्णालयाजवळच नवीन इमारत बांधावी लागणार आहे. तेव्हाच एकत्र दवाखाना दिसेल. तसेच कर्मचारी, डॉक्टर यांच्यासाठीही सोयीचे होईल.
महिला व बाल रुग्णालयाच्या मागील बाजूस तहसीलदार, उपविभागीय अधिकारी व न्यायाधीश यांची निवासस्थाने आहेत. ही निवासस्थाने अगदी वर्दळीच्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर इमारती सुद्धा जुन्या आहेत. त्यामुळे काही अधिकारी या निवासस्थानांमध्ये राहत नाही. जिल्हा परिषदेने स्वत:ची जागा रुग्णालयाला देण्यास मंजुरी दिली आहे. याबाबतचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर झाला आहे. मात्र प्रशस्त इमारत बांधण्यासाठी निवासस्थाने असलेली जागा मिळणे आवश्यक आहे. सदर जागा महसूल विभागाची असल्याने जिल्हाधिकारी यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहणार आहे.
एप्रिलमध्ये मिळाला ३० कोटींचा निधी
१०० खाटांचे महिला व बाल रुग्णालय बांधण्यासाठी एप्रिल २०१९ मध्येच एनआरएचएमअंतर्गत सुमारे ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र इमारतीची जागा निश्चित झाली नसल्याने सदर निधी चार महिन्यांपासून पडून आहे. महसूल विभागाने जागा उपलब्ध करून दिल्यास प्रशस्त इमारत बांधणे शक्य होणार आहे. रुग्णकल्याण समितीच्या नियामक मंडळाची सभा पार पडली. या सभेत महसूल विभागाची जागा मागणीसाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. महसूल विभागाची जागा मिळाल्यास या ठिकाणी प्रशस्त इमारत बांधण्याचा मार्ग मोकळा होईल.