वनाच्या सुरक्षेसाठी उपाययोजना हवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 01:46 AM2018-03-22T01:46:01+5:302018-03-22T01:46:01+5:30
मानवी जीवनात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र वृक्षांची होणारी बेसुमार कत्तल भविष्यात धोक्याची घंटा ठरणार आहे.
ऑनलाईन लोकमत
कुरखेडा : मानवी जीवनात वृक्षांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र वृक्षांची होणारी बेसुमार कत्तल भविष्यात धोक्याची घंटा ठरणार आहे. या युगातही जंगल, दऱ्याखोऱ्यात निवास करणाऱ्या नागरिकांची उपजीविका ही वृक्षावर अवलंबून असते. वृक्षांचा कत्तलीमुळे पर्यावरणालासुद्धा मोठी हानी पोहोचून आरोग्याची समस्या गंभीर होत आहे. भविष्याच्या सुरक्षेकरिता वेळीच उपाययोजना होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुरखेडाचे नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंशी यांनी केले.
जागतिक वन दिनानिमित्त वन परीक्षेत्र कार्यालय कुरखेडा येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सिनेट सदस्य चांगदेव फाये, न. पं. उपाध्यक्ष जयश्री धाबेकर, वन परिक्षेत्र अधिकारी सचिन डोंगरवार, उपसरपंच राजन खुणे, पोलीस पाटील नारायण टेंभुर्णे, पत्रकार सिराज पठाण, क्षेत्रसहायक एस. बी. कायते, पशुवैद्यकीय अधिकारी सोनार, प्राचार्य भरणे, सानिया मंगर, डी. आर. मल्लेलवार, डी. जे. हेपट, गांगरेड्डीवार, माणिक राऊत उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. मोहबंशी म्हणाले, वनाचे संरक्षण वृक्षांची लागवड व संगोपन याला राष्ट्रीय कर्तव्य म्हणून नागरिकांनी जबाबदारी स्वीकारावी. इतर लोकांनाही या मोहिमेत जोडण्याचा प्रयत्न करावा, तेव्हाच वनांचे संरक्षण होईल.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही विचार व्यक्त केले. तत्पूर्वी वन विभागाच्या वतीने शहरात ढोल ताशा व भजनासह वृक्षदिंडी काढून वृक्ष लागवडीचा संदेश देण्यात आला. प्रास्ताविक वन परिक्षेत्र अधिकारी डोंगरवार, संचालन क्षेत्रसहायक प्रकाश भडांगे तर आभार वनरक्षक धात्रक यांनी मानले. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.