समाजकार्यात युवकांनी पुढे येण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:40 AM2017-07-18T00:40:25+5:302017-07-18T00:40:25+5:30
जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाने जीवनाचे सार्थक करायचे असेल तर सामाजिक कार्यात भाग घेणे महत्त्वाचे आहे.
अनिकेत आमटे यांचे प्रतिपादन : आरमोरीत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; रोवणी करणाऱ्या महिलांना मार्गदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : जन्माला आलेल्या प्रत्येक मानवाने जीवनाचे सार्थक करायचे असेल तर सामाजिक कार्यात भाग घेणे महत्त्वाचे आहे. दिवसेंदिवस सामाजिक क्षेत्रामध्ये पशुप्रेमी व निसर्गप्रेमीची संख्या वाढली आहे. मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी बहूल भागात सामाजिक कार्य करण्यासाठी युवकांनी पुढे येण्याची गरज आहे, असे प्रतिपादन समाजसेवक डॉ. अनिकेत प्रकाश आमटे यांनी केले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गडचिरोलीच्या वतीने आरमोरी येथील बँक शाखेच्या सभागृहात सोमवारी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह तथा रोवणीची कामे करणाऱ्या महिला व त्यांच्या समस्यांचे निराकरण या विषयावर मार्गदर्शनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी मंचावर अध्यक्षस्थानी समाजकार्य विकास संस्थेचे अध्यक्ष तथा सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार होते. मार्गदर्शक म्हणून समिक्षा आमटे, प्रमुख अतिथी म्हणून गडचिरोली नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे, इंदिरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुधीर भातकुलकर, मयूर पिलेवार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, मानद सचिव अनंत साळवे, रितेश पाल आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना अनिकेत आमटे म्हणाले, सामाजिक बांधिलकी जपताना समाजातील सर्व सामान्य लोकांसोबत त्यांच्याच पध्दतीने वागणे गरजेचे ठरते. आदिवासी क्षेत्रात काम करताना अनेक अडचणी येतात. मात्र त्यावर मात करणे गरजेचे असते. संचालन प्रा. नरेंद्र आरेकर तर आभार बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी मानले
महिलांना हातमोजे वितरण
यावेळी इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच रोवणीचे काम करणाऱ्या महिलांना सुरक्षेच्या दृष्टीकोणातून प्लास्टिकच्या हाजमोज्यांचे वितरण करण्यात आले.