पर्लकोटाच्या अरूंद पुलाकडे सरकारचे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2017 12:39 AM2017-08-13T00:39:22+5:302017-08-13T00:39:52+5:30

भामरागडलगत पर्लकोटा नदीवर पूल बांधकामास आता ३५ वर्षांचा कालावधी उलटला आहे.

Negligence of Government towards the narrow bridge of Pearlkota | पर्लकोटाच्या अरूंद पुलाकडे सरकारचे दुर्लक्षच

पर्लकोटाच्या अरूंद पुलाकडे सरकारचे दुर्लक्षच

Next
ठळक मुद्देअपघाताची शक्यता बळावली : अहेरी उपविभागातील नागरिकांचा धोकादायक प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : भामरागडलगत पर्लकोटा नदीवर पूल बांधकामास आता ३५ वर्षांचा कालावधी उलटला आहे. तेव्हा या पुलाचे काम नदीचे पात्र व रहदारी पाहून करण्यात आले होते. मात्र पूर्वीच्या तुलनेत आता नदीचे पात्र विस्तारले असून आवागमन करणाºया वाहनांची संख्याही प्रचंड वाढली आहे. परिणामी दरवर्षीच्या पावसाळ्यात या पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर अरूंद व कमी उंचीचा पूल अधिकच धोकादायक होत आहे. मात्र या ठिकाणी नव्याने उंच व रूंद पूल उभारण्याच्या कामाकडे लोकप्रतिनिधीसह प्रशासनाचेही प्रचंड दुर्लक्ष होत आहे.
भामरागड-आलापल्ली मार्गालगत बारमाही वाहणाºया पर्लकोटा नदीवरील अरूंद पुलामुळे पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होत असतो. उन्हाळ्यात व हिवाळ्यात या अरूंद पुलाची डोकेदुखी वाढत असून अपघातास निमंत्रण मिळत असते. पर्लकोटा नदीवरील पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांकडे सातत्याने होत आहे. सदर अरूंद पुलावरून अनेक दुचाकी व चारचाकी वाहने नदीपात्रात कोसळून अपघात घडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. दोन ते तीन जणांना जीवही गमवावा लागला. सदर पुलावरून लोखंडी कठडे लावणे व काढण्याचा उपक्रम बंद झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात कठडे काढायचे व उन्हाळ्यात पुन्हा लावण्यात येत होते. मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून प्रशासनाकडून या कामाला बगल दिली जात आहे. या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
३५ वर्षांपूर्वी जेव्हा पर्लकोटा नदीवर पुलाचे काम करण्यात आले. त्यावेळी नदीचे पात्र लहान होते. तसेच रहदारीवर असलेल्या वाहनांचीही संख्या कमी होती. मात्र आता वाढत्या लोकसंख्येसोबतच वाहनांचीही संख्या प्रचंड वाढली आहे. तसेच पाण्याच्या वाढत्या प्रवाहाने पर्लकोटा नदीचे पात्रही विस्तारले आहे. त्यामुळे येथे नव्याने पुलाचे बांधकाम करणे गरजेचे आहे. रात्री-बेरात्री या पुलावरून चारचाकी वाहनाची वर्दळ असते. पथदिव्याअभावी रात्रीच्या सुमारास अनेकदा या पुलावरून नदीच्या पात्रात वाहने कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. सदर पूल अतिशय अरूंद असल्याने वाहनधारकांना तसेच पादचाºयांना आवागमन करणे कठीण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून दररोज पहाटेच्या सुमारास या पुलावरून हेमलकसापर्यंत मॉर्निंगवाक करणाºयांची संख्या वाढली आहे. मात्र या अरूंद पुलामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. सध्या या नदीला पूर नसला तरी धोका कायम आहे.
कठडे व पथदिवे लावा
पर्लकोटा नदीवरील पुलावर प्रशासनाने कठडे लावावेत, तसेच रात्रीच्या सुमारास वाहतूक सुरक्षित व्हावी, याकरिता पथदिवे लावावे, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. कठडे व पथदिव्याअभावी वाहनधारकांचा प्रवास धोकादायक सुरू आहे.
 

Web Title: Negligence of Government towards the narrow bridge of Pearlkota

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.