शेजारचा शेतमालकच निघाला ‘त्या’ शेतकरी महिलेचा मारेकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:38 AM2021-07-27T04:38:32+5:302021-07-27T04:38:32+5:30
कुरखेडा : शहरातील शीलाबाई कसारे या वृद्ध शेतकरी महिलेचा मृतदेह गेल्या ५ जुलै रोजी तिच्याच शेतात आढळला होता. रक्ताने ...
कुरखेडा : शहरातील शीलाबाई कसारे या वृद्ध शेतकरी महिलेचा मृतदेह गेल्या ५ जुलै रोजी तिच्याच शेतात आढळला होता. रक्ताने माखलेला चेहरा आणि शवविच्छेदन अहवाल यावरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला, पण आरोपीचा शोध लागत नव्हता. अखेर २० दिवसांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आहे. शीलाबाईच्या शेताशेजारी शेत असणाऱ्या युवकाला याप्रकरणी अटक करण्यात आली.
हिरालाल ऊर्फ गोलू सुक्रुजी धांडे (२८ वर्षे) असे अटक झालेल्या युवकाचे नाव आहे. शीलाबाई यांचा मृतदेह त्यांच्या शेतात दि. ५ जुलै रोजी पहाटे आढळून आला होता. चेहरा रक्ताने माखला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी तिची हत्या केली असावी, असा संशय व्यक्त करत तक्रार दाखल केली होती. दरम्यान, शेजारीच शेत असलेल्या गोलू धांडे या युवा शेतकऱ्याशी त्यांचे शेतीच्या वादातून नेहमी भांडण होत असे, अशी माहिती तक्रारीत देण्यात आली होती.
पोलिसांनी गुप्तपणे तपास करीत संशयित आरोपी म्हणून गोलू धांडे याला अटक केली. त्याच्या विरोधात भादंवि कलम ३०२ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयासमोर उभे करण्यात आले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भंवर यांच्या मार्गदर्शनात कुरखेडा पोलीस करीत आहेत.