नेटअभावी धान्य विक्री आॅफलाईनच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 11:45 PM2018-11-15T23:45:55+5:302018-11-15T23:47:18+5:30

राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुरवठा विभागाच्या वतीने सार्वजनिक वितरण प्रणाली आॅनलाईन करण्यात आली आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी पॉस मशीनचा वापर करून या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी, असे शासनाचे निर्देश आहेत.

Net non-for-sale grain sales offline | नेटअभावी धान्य विक्री आॅफलाईनच

नेटअभावी धान्य विक्री आॅफलाईनच

googlenewsNext
ठळक मुद्देशिधापत्रिकाधारकही त्रस्त : तहसील कार्यालयात स्वस्त धान्य दुकानदारांची गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुरवठा विभागाच्या वतीने सार्वजनिक वितरण प्रणाली आॅनलाईन करण्यात आली आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी पॉस मशीनचा वापर करून या प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी, असे शासनाचे निर्देश आहेत. मात्र पॉस मशीनच्या सहाय्याने स्वस्त धान्याची विक्री करण्यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हीटी असणे अत्यावश्यक आहे. मात्र एटापल्ली तालुक्यात नेट कनेक्टिव्हिटी राहत नसल्याने या तालुक्यात स्वस्त धान्य दुकानामार्फत शिधापत्रिकाधारकांना धान्याची विक्री आॅफलाईन पध्दतीनेच केली जात आहे.
एटापल्ली तालुक्यात भारतीय दूरसंचार निगमची भ्रमणध्वनी सेवा आहे. इतर कोणत्याही कंपन्यांची या तालुक्यात प्रभावी सेवा नाही. तालुक्यातील शेकडो गावांमध्ये अद्यापही बीएसएनएलची दूरसंचार सेवा पोहोचली नाही. शासनाने आॅनलाईन कामावर भर दिला असला तरी या तालुक्यात इंटरनेटचा अभाव असल्याने अनेकदा अधिकारी व कर्मचाऱ्यांना तालुका व जिल्हा मुख्यालय गाठावे लागते. प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना शेकडो किमी अंतर गाठून तालुका मुख्यालय येऊन आॅनलाईन कामे करावी लागत आहेत. यामध्ये नागरिकांचा वेळ व पैसा खर्च होत आहे.
एटापल्ली तालुक्यात एकूण ११५ स्वस्त धान्य दुकाने आहेत. एटापल्ली तालुक्यात केवळ सहा स्वस्त धान्य दुकानदार आॅनलाईन पध्दतीने पॉस मशिनच्या सहाय्याने शिधापत्रिकाधारकांना धान्याची विक्री करीत आहेत. मात्र इंटरनेटचा अभाव असल्याने इतर सर्व दुकानदार धान्याची विक्री आॅफलाईन पध्दतीनेच करीत आहेत. शासनाच्या नियमानुसार शिधापत्रिकाधारकांना आॅनलाईन पध्दतीने धान्याची विक्री करणे बंधनकारक आहे. मात्र इंटरनेटचा अभाव असल्याने या तालुक्यात आॅफलाईन पध्दतीने धान्याची विक्री करावी लागत आहे.
आॅफलाईन पध्दतीने धान विक्री केल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदारांना विक्री व्यवहाराची संपूर्ण माहिती तालुका मुख्यालयी नेऊन तिथे आॅनलाईन डाटा तयार करावा लागत आहे.
या कामासाठी तालुक्यातील प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदारांना महिन्यातून एकदा तहसील कार्यालयात यावे लागत आहेत. त्यामुळे तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागात नेहमीच स्वस्त धान्य दुकानदारांची गर्दी दिसून येते.
१५ दिवसच होते धान्य वाटप
शासनाने पॉस मशिनच्या सहाय्याने आॅनलाईन पध्दतीने धान्याची विक्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाची अंमलबजावणी गडचिरोली जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागात केली जात आहे. मात्र एटापल्ली तालुक्यासह अहेरी उपविभागात इंटरनेटचा अभाव असल्याने पॉस मशिन काम करीत नाही. परिणामी आॅनलाईन डाटा तालुका मुख्यालयी तयार करण्यासाठी अनेक स्वस्त धान्य दुकानदार केवळ १४ ते १५ दिवस धान्याची विक्री करतात. पूर्वी महिनाभर धान्याची विक्री केली जात होती. मात्र आॅनलाईन पध्दतीने धान्य विक्री करण्याची मुदत कमी झाली आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांनाही धान्य वाटप सुरू झाल्यापासून १५ दिवसांत धान्य उचलावे लागत आहे. अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्या दुकानाच्या सूचना फलकावर तशी सूचनाही लिखीत स्वरूपात लावली आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांना आता १५ दिवसांतच धान्याची उचल करावी लागत आहे.

Web Title: Net non-for-sale grain sales offline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.