वैरागडात जुन्याच नालीवर दाखविले नवीन बांधकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:39 AM2021-08-23T04:39:19+5:302021-08-23T04:39:19+5:30
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौदाव्या वित्त आयोगामधून बालाजी पोफळी ते तुकडु बोधनकर ...
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. चौदाव्या वित्त आयोगामधून बालाजी पोफळी ते तुकडु बोधनकर यांच्या घरापर्यंत व सुरेश लांजीकर ते प्रकाश खरवडे यांच्या घरापर्यंत नालीचे बांधकाम करण्यात आले. या दोन्ही ठिकाणी जुन्या नाल्या होत्या. जुन्या नाल्यातील गाळ काढून थोडीफार दुरुस्ती करून या दोन्ही नाल्यांचे नवीन बांधकाम दाखवून बनावट मजुरांच्या नावे बिल काढून १४व्या वित्त आयोगाच्या निधीची विल्हेवाट लावण्यात आली, तसेच पशुवैद्यकीय दवाखाना ते स्वागत गेटपर्यंतच्या नालीचे नव्याने बांधकाम करण्यात आले. पण, नियमाप्रमाणे नालीचे बांधकाम करण्यात आले नाही. नालीची लांबी, रुंदी आणि उंची नियमाप्रमाणे नसून या बांधकामात एकाच कुटुंबातील नऊ मजूर दाखवून निधीची विल्हेवाट लावली आहे. मजुरांच्या नावे या तिन्ही नाली बांधकामात बनावट मजुरांच्या नावे बिल काढण्यात आले आहे. त्यातील एकही मजूर या बांधकामावर नव्हता, असे नागरिकांनी मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्याकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सन २०१८ - १९च्या विकासकामाच्या नियोजन आराखड्यात वैरागड, पाटणवाडा, मेंढेबोडी या तीन गावांना गटारे बांधकामासाठी पाच लाख रुपयांची तरतूद असताना तीन गावांपैकी फक्त वैरागड येथे तीन नाल्याचे बांधकाम करून जवळपास साडेनऊ लाख रुपये खर्च दाखविला आहे. या बांधकामासाठी जे मजूर होते, त्यांना अल्प मजुरी देऊन या बांधकामासाठी काही खासगी संस्थेत काम करणारे कर्मचारी, व्यावसायिक यांची मजूर म्हणून नावे नाेंदवून मजुरीचे बिल काढण्यात आले.
या प्रकरणाची सखोल व योग्य चौकशी करून वैरागड ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच ग्रामविकास अधिकारी व नियमबाह्य परवानगी देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कविश्वर खोब्रागडे, अश्विन लांजीकर, बादल गिरीपुंजे, हितेश कुळसंगे, अंकित घुबडे यांनी निवेदनाद्वारे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे केली आहे.
220821\img-20210822-wa0065.jpg
जुन्याच नालीवर दाखवले नवीन बांधकाम