नवीन जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 06:00 AM2020-01-20T06:00:00+5:302020-01-20T06:00:22+5:30
जिल्ह्यात इंटरनेट व वीज सेवा प्रत्येक गावात पोहोचविण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले पाहिजे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी शिक्षण, आरोग्य, दळणवळण, अंगणवाडी सुविधांवर विशेष चर्चा केली. पुढील दोन आठवड्यात सर्व विभागांची कामे समजून घेतली जातील. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या ठिकाणी काम करण्याची चांगली संधी आहे, असे मार्गदर्शन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हाधिकारी पदाचा प्रभार स्वीकारल्यानंतर तत्काळ जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी रविवारी सकाळी ११ वाजता जिल्हा नियोजन समितीच्या कामांचा आढावा घेतला. आढावा बैठकीदरम्यान विभाग प्रमुख व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.
बैठकीला अपर जिल्हाधिकारी सुधाकर कुळमेथे, प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी टी. एस. तिडके, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर आदी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना दीपक सिंगला म्हणाले, महसूल, जिल्हा परिषद, वन विभाग व शासनाच्या इतर सर्व विभागांनी टीम म्हणून काम केले पाहिजे. विकासात्मक कामांमध्ये महसूल विभागानेही योगदान द्यायचे आहे. जिल्ह्यात इंटरनेट व वीज सेवा प्रत्येक गावात पोहोचविण्यास प्रशासनाने प्राधान्य दिले पाहिजे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी शिक्षण, आरोग्य, दळणवळण, अंगणवाडी सुविधांवर विशेष चर्चा केली. पुढील दोन आठवड्यात सर्व विभागांची कामे समजून घेतली जातील. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत या ठिकाणी काम करण्याची चांगली संधी आहे, असे मार्गदर्शन केले. यावेळी विविध विभागांकडून जिल्हाधिकारी सिंगला यांचा सत्कार करण्यात आला.
नवीन संकल्पना सूचविण्याचे कर्मचारी व अधिकाऱ्यांना आवाहन
गडचिरोली जिल्ह्याला अजून पुढे घेऊन जाण्यासाठी विविध विभागांना नवनवीन कल्पना सादर करण्याच्या सूचना केल्या. नवीन संकल्पनांचे स्वागतच केले जाईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले.
गडचिरोली जिल्ह्यात खासगी दवाखाने मोठे व अत्याधुनिक नाहीत. त्यामुळे संपूर्ण आरोग्य व्यवस्था शासकीय यंत्रणेवर अवलंबून आहे. अशावेळी शासकीय दवाखाने व त्यातील सोयीसुविधा उच्च दर्जाच्या असाव्यात, यासाठी आपण प्रयत्न करण्याची गरज आहे, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
पल्स पोलिओ लसीकरणाचा शुभारंभ
जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या हस्ते नवेगाव अंगणवाडी केंद्रातील बालकाला रविवारी सकाळी पल्स पोलिओ डोज पाजून लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद सदस्य वर्षा कौशीक, पं.स. सभापती मारोतराव इचोडकर, प्रतिभा चौधरी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, माता बाल व संगोपण अधिकारी डॉ.सुनील मडावी, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी हजर होते.