आलापल्ली क्षेत्रात नवे चेहरेच मैदानात
By admin | Published: February 15, 2017 01:34 AM2017-02-15T01:34:06+5:302017-02-15T01:34:06+5:30
आलापल्ली-वेलगूर हे जिल्हा परिषद क्षेत्र अहेरी तालुक्यात एकमेव साधारण प्रवर्गासाठी राखीव क्षेत्र आहे.
काँग्रेस उमेदवाराची ऐनवेळीच माघार : नऊ उमेदवार रिंगणात
प्रशांत ठेपाले आलापल्ली
आलापल्ली-वेलगूर हे जिल्हा परिषद क्षेत्र अहेरी तालुक्यात एकमेव साधारण प्रवर्गासाठी राखीव क्षेत्र आहे. या क्षेत्रात अनेक दिग्गज मैदानात उतरण्याच्या तयारीत होते. परंतु नामांकन पत्र परत घेतल्यानंतर आता बहुतांशी नवे चेहरेच मैदानात राहिले आहे.
भाजपच्या वतीने बंडू भांडेकर व मोहन मदने हे दोघेही इच्छुक उमेदवार होते. अंतिम क्षणी मोहन मदने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर बंडू भांडेकर यांना काँग्रेसची उमेदवारी देण्यात आली. मोहन मदने हे भाजपच्या संघ शाखेशी जुळलेले असून या भागात भाजपसोबतच नाग विदर्भ आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांनाही मदने यांना सांभाळावे लागणार आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या बंडू भांडेकरांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यामुळे आता या मतदार संघात काँग्रेसचा उमेदवारच राहिलेला नाही. काँग्रेसचे जुने कार्यकर्ते मुस्ताक हकीम यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. परंतु त्यांना ती मिळाली नाही. त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून बबलू उर्फ अब्दूल जमीर हकीम यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु न्यायालयाने तिन अपत्याच्या कारणावरून त्यांची उमेदवारी रद्द ठरविली. त्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला. आता. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विशेष भटपल्लीवार हे उमेदवार आहेत व येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष तोडसाम हे ही अपक्ष म्हणून मैदानात उभे आहे. माजी आमदार दीपक आत्राम यांच्या आदिवासी विद्यार्थी संघाकडून जिल्हा परिषदेचे विद्यमान कृषी व पशुसंवर्धन सभापती अजय कंकडालवार हे मैदानात आहे. भाजप वगळता या मतदार संघात इतर पक्षाचे व अपक्षही उमेदवार तरूण व नवे चेहरे आहेत. त्यामुळे निवडणुकीतही या नव्या चेहऱ्यांनाच मतदारांना आता कौल द्यायचा आहे. येत्या चार ते पाच दिवसात प्रचार वाढणार आहे.