नवीन तेंदूपत्त्याचा दर्जा उत्तम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:28 AM2018-05-12T01:28:36+5:302018-05-12T01:28:36+5:30
यावर्षी तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे यावर्षी तेंदूपत्त्याचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा चांगले होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी भाव मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
भामरागड : यावर्षी तेंदूपत्त्याचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे यावर्षी तेंदूपत्त्याचे उत्पादन मागील वर्षीपेक्षा चांगले होईल, अशी अपेक्षा आहे. मात्र मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी भाव मिळाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील ५० टक्के जंगलात तेंदूपत्त्याची झाडे आहेत. येथील तेंदूपत्त्याचा दर्जाही अतिशय चांगला आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यातील तेंदूपत्ता खरेदीसाठी कंत्राटदार इच्छुक असतात. मात्र यावर्षी तेंदूपत्त्याच्या बाजारपेठेत कमालीची मंदी असल्याने याचा परिणाम तेंदूपत्ता लिलावांवर पडत आहे. तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम जवळ आला आहे. काही ठिकाणी तर तेंदूपत्ता संकलनाचे कामही सुरू झाले आहे. मात्र काही ठिकाणच्या ग्रामसभांचे लिलावच झाले नाही. त्यामुळे त्या गावातील तेंदूपत्ता संकलनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तेंदूपत्ता संकलनावर संकटाचे सावट असले तरी तेंदूपत्त्याचा दर्जा मात्र अतिशय चांगला आहे. अगदी सुरूवातीपासून यावर्षी कडक ऊन आहे. जंगल जळाल्यामुळे आणखी उष्णता वाढून तेंदूपत्ता चांगला आला आहे. विशेष म्हणजे, यावर्षीच्या तेंदूपत्त्यावर डाग नाही. त्याचबरोबर पालवीला अधिकची पाने फुटली आहेत. त्यामुळे तेंदूपत्त्याच्या उत्पादनात वाढ होण्याचा अंदाज गावकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. उत्पादन जरी वाढले असले तरी यावर्षी तेंदूपत्त्यासाठी अत्यंत कमी भाव उपलब्ध झाला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. मजुरांना मात्र अधिकची मजुरी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
१२ ग्रामपंचायतींना लिलावाची प्रतीक्षा
भामरागड तालुक्यात एकूण १७ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी इरूकडुम्मे, बोटनफुंडी, मन्नेराजाराम, पल्ली, मडवेली या गावांचा लिलाव झाला आहे. या गावांना प्रती शेकडा ४ हजार ५५५ रूपये भाव उपलब्ध झाला आहे. मात्र इतर १२ ग्रामपंचायतींमधील ग्रामसभांचे लिलाव झाले नाही. त्यामुळे या गावातील मजूर व नागरिक चिंताग्रस्त असल्याचे दिसून येत आहे. ग्रामपंचायतींनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आहे.