नव्या पीएचसीचे प्रस्ताव प्रलंबित
By admin | Published: February 15, 2016 01:20 AM2016-02-15T01:20:53+5:302016-02-15T01:20:53+5:30
शासन निर्णयाचा आधार घेऊन वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे आरोग्य पथकाचे प्राथमिक केंद्रात रूपांतर करणे,
पाच वर्षे उलटली : शासन दरबारी धूळ खात
दिलीप दहेलकर गडचिरोली
शासन निर्णयाचा आधार घेऊन वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने राज्य शासनाकडे आरोग्य पथकाचे प्राथमिक केंद्रात रूपांतर करणे, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र निर्माण करणे तसेच नव्या उपकेंद्राच्या मंजुरीसाठी प्रस्ताव सादर केले. या बाबीला पाच वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र राज्य शासनाने केवळ बोटावर मोजण्याइतके आरोग्य केंद्र सोडले तर इतर केंद्रांना मंजुरी दिली नाही. आरोग्य केंद्राचे अनेक प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असल्याने जि.प.ची आरोग्य यंत्रणा बळकट होण्यासाठी अडचणी जाणवत असून रूग्णांचे हाल होत आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यात ४५ प्राथमिक आरोग्य, ३६ आरोग्य पथक व उपकेंद्र आहेत. २० प्राथमिक आरोग्य पथकांचे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूपांतर करण्यासाठीचा प्रस्ताव सन २०१० मध्ये जि.प. च्या आरोग्य विभागाने राज्याचे आरोग्य संचालक, आयुक्तांमार्फत शासनाकडे पाठविले. यापैकी तीन पथकाचे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूपांतर करण्यासाठी शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. यामध्ये चामोर्शी तालुक्यातील लखमापूर बोरी, भेंडाळा व भामरागड तालुक्यातील कोठी यांचा समावेश आहे.
याशिवाय एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी व अहेरी तालुक्यातील आलापल्ली हे दोन पथक आरोग्य केंद्रात रूपांतरीत करण्यास शासनाने हिरवी झेंडी दाखविली आहे. उर्वरित १५ प्राथमिक आरोग्य पथकाचे प्रस्ताव प्रलंबित आहेत.
नवीन ४१ प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला मंजुरी देण्यासंदर्भाचा प्रस्ताव जि.प.च्या आरोग्य विभागाने गेल्या तीन वर्षांपूर्वी शासनाकडे सादर केले. मात्र हे सर्वच प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित आहेत. यामुळे जि.प.ची आरोग्य यंत्रणा अस्थिपंजर झाली आहे.
अशी आहे नव्या पीएचसीची स्थिती
शासनाने एटापल्ली तालुक्यातील पिपली बुर्गी, आलापल्ली, सिरोंचा तालुक्यातील रंगय्यापल्ली, चामोर्शी तालुकयातील लखमापूर बोरी व भामरागड तालुक्यातील कोठी या पाच पीएचसींना हिरवी झेंडी दाखविली आहे. मात्र एकही पीएचसी पूर्णत्वास आली नाही. पिपली बुर्गी पीएचसीच्या इमारतीसाठी जागा प्राप्त झाली असून निधी मिळण्यासाठीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. आलापल्ली पीएचसीच्या इमारतीसाठी जागा मिळाली असून वन विभागाने सदर जागेचा ताबाही दिला आहे. बांधकामाचे अंदाजपत्र तयार झाले असून यासाठी एनआरएचएम अंतर्गत सात कोटींचा निधी मिळाा असल्याची माहिती आहे. रंगय्यापल्ली व लखमापूर बोरी पीएचसीच्या इमारतीसाठी निधीची गरज आहे. तर कोठी पीएचसीच्या इमारतीसाठी जागेचा शोध सुरू आहे.
नव्या सात उपकेंद्राचे प्रस्ताव मंत्रालयात पेंडिंग
राज्याच्या नियोजन विभागाच्या १८ फेब्रुवारी २००२ च्या शासन निर्णयानुसार दर १५ किमी अंतरावर एक प्राथमिक आरोग्य केंद्र व पाच किमी अंतरावर एक उपकेंद्र असणे आवश्यक आहे. या शासन निर्णयानुसार जि.प.च्या आरोग्य विभागाने शासनस्तरावर सात नवीन उपकेंद्राचे प्रस्ताव सन २०१० मध्ये सादर केले. मात्र हे सर्व प्रस्ताव मंत्रालयात पेंडिंग आहेत. यामध्ये भामरागड तालुक्यातील हेमलकसा, मिरगुडवंचा, हिंदेवाडा, गोपनार, नारगुंडा, तसेच एटापल्ली तालुक्यातील कसनासूर व चामोर्शी तालुक्यातील सोमनपल्ली आदींचा समावेश आहे.
नक्षलग्रस्त भागाच्या जलद विकासासाठी विशेष कृती कार्यक्रमांतर्गत सिरोंचा तालुक्यातील पेंटीपाका व कुरखेडा तालुक्यातील पुराडा या आरोग्य पथकाचे प्राथमिक आरोग्य केंद्रात रूपांतरीत करण्यासंदर्भाचा प्रस्ताव मंत्रालयात प्रलंबित आहे.