नवमतदारांनो मतदानाचा हक्क बजावा; विधानसभेसाठी नावनोंदणी करा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 05:30 PM2024-06-28T17:30:28+5:302024-06-28T17:32:29+5:30
बीएलओंची घरोघरी भेट : मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीदरम्यान अनेक बुथवर मतदार यादीमध्ये घोळ दिसून आला. अनेक मतदारांची नावे यादीत नव्हती, तर बहुतांश मतदारांची नावे दुसऱ्याच बुथच्या यादीत होती. त्यामुळे निवडणूक विभागाने मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केलेला आहे. दि. २५ जून ते २४ जुलै या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय केंद्रस्त अधिकारी (बीएलओ) हे घरोघरी भेट देऊन नवीन पात्र मतदारांची नोंदणी तसेच यादीची तपासणी करतील.
मतदार यादीचा संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत जे मतदार १८ वर्षांचे झाले आहेत, अशा पात्र मतदारांचे नमुना क्र. ६ भरून नवीन नोंदणी करणे, मतदार यादीत मृत मतदार, दुबार मतदार व जे मतदार स्थलांतरित झाले, अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून कमी करून मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यात येणार आहेत.
१ जुलै रोजी १८ वर्षे पूर्ण करणाऱ्यांची नोंदणी
१ जुलै २०२४ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नवमतदारांची नोंदणी केली जाणार आहे. जिल्ह्यातील अशा नवमतदार म्हणून नाव नोंदणी करता येणार आहे.
नवमतदारांनो नोंदणी कशी कराल?
● निवडणूक विभागाने निश्चित केलेल्या अर्हता दिनांकावर वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांना विधानसभा निवडणुकीसाठी मतदार म्हणून नोंदणी करता येणार आहे.
● यासाठी त्यांना केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे ऑफलाइन, तर निवडणूक विभागाच्या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.
२५ जुलै रोजी एकत्रिकृत यादी
● विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार मतदान केंद्राच्या नावात बदल, ठिकाणात बदल, पत्त्यात बदल करुन घेता येईल.
● सर्व दुरुस्तीसह दि. २५ जुलै रोजी एकत्रिकृत मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
२० ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार
दि. २५ जुलै ते ९ ऑगस्ट या कालावधीत प्रसिद्ध केलेल्या मतदार यादीवर दावे व हरकती सादर करता येणार आहेत. १९ ऑगस्टपर्यंत हरकती निकाली काढून २० ऑगस्ट रोजी अंतिम यादी प्रसिद्ध होईल.
मतदारांनी आपले नाव आवश्यक कागदपत्रांसह नमुना क्र. ६ भरून विहित मुदतीत मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत केंद्र, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावे.
- संजय दैने, जिल्हाधिकारी