गावालगतच्या आमराई परिसरातून नऊ ड्रम गुळसडवा नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:24 AM2019-07-20T00:24:10+5:302019-07-20T00:24:33+5:30
तालुक्यातील रंगयापल्ली गावालगत असलेल्या आमराईत विक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी लपवून ठेवलेला नऊ ड्राम गुळसडवा मुक्तिपथ तालुका चमूने शुक्रवारी नष्ट केला. सोबतच दारू गाळण्यासाठी वापरात येणारे साहित्यही नष्ट केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील रंगयापल्ली गावालगत असलेल्या आमराईत विक्रेत्यांनी दारू गाळण्यासाठी लपवून ठेवलेला नऊ ड्राम गुळसडवा मुक्तिपथ तालुका चमूने शुक्रवारी नष्ट केला. सोबतच दारू गाळण्यासाठी वापरात येणारे साहित्यही नष्ट केले.
रंगयापल्ली हे गाव येथील दारू विक्रेत्यांमुळे येथील नागरिकांसह इतरही गावांसाठी डोकेदुखी बनले आहे. मुक्तिपथ गाव संघटनेच्या पुढाकाराने दारूविक्री बंदीचा ठरावही घेण्यात आला आहे. मुजोर झालेले विक्रेते दारूविक्री करीतच आहे. यामुळे गावाचे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. गावातील दारूविक्री बंद व्हावी यासाठी गुरुवारी ग्रामपंचायत प्रशासन आणि गाव संघटनेद्वारे बैठक घेण्यात आली. या बैठकीतील विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी मुक्तिपथ तालुका चमू शुक्रवारी या गावात गेली. तालुका चमू परत येत असताना गावानजीकच्या आमराईमध्ये दारूच्या भट्ट्या असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी हा परिसर पिंजून काढला असता दारू गाळून विक्रेत्यांनी साहित्य झाडावर लपवून ठेवल्याचे लक्षात आले. संशयित जागा खोदल्या असता ९ ड्राम गुळाचा सडवा जमिनीखाली गाडून ठेवल्याचे लक्षात आले. हा सडवा नष्ट केला.
५० किलो साखरही नष्ट
मुक्तिपथने काहीच दिवसांपूर्वी अहेरी तालुक्यात पांढऱ्या गुळाची होत असलेली साठेबाजी उघड केली. यावर पर्याय म्हणून आता साखरेची दारू बनविण्याचा प्रकार सिरोंचा तालुक्यात सुरू झाला आहे. याच परिसरात दारूसाठी ठेवून असलेली ५० किलो साखरही मुक्तिपथ कार्यकर्त्यांनी नष्ट केली. या कारवाईने धाबे दणाणले आहेत.
दुचाकीसह ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त
देसाईगंज पोलिसांनी गुरूवारी निरंकारी भवन परिसरात धाड टाकून दुचाकीसह ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई केली. गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विक्की प्रदीप सिडाम (२५) रा. आंबेडकर वार्ड देसाईगंज अशी आहे. आरोपी देसाईगंजकडून कोंढाळाकडे पांढऱ्या रंगाच्या दुचाकीने विदेशी दारू नेत होता. पोलिसांनी सदर गाडी पकडून या गाडीतून ३५ हजार रुपये किमतीची विदेशी दारू जप्त केली. दारू विक्रेत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई देसाईगंज पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार बंडे व इतर पोलिसांनी केली. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार प्रदीप लांडे यांच्या मार्गदर्शनात नाईक पोलीस शिपाई सदाशिव धांडे करीत आहेत.