वाहनासह नऊ लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 11:04 PM2018-04-30T23:04:13+5:302018-04-30T23:04:46+5:30
उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने आरमोरी मार्गावरील खरपुंडी नाक्याजवळ सापळा रचून वाहनासह सुमारे ८ लाख ८० हजार रूपयांची दारू जप्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या पथकाने आरमोरी मार्गावरील खरपुंडी नाक्याजवळ सापळा रचून वाहनासह सुमारे ८ लाख ८० हजार रूपयांची दारू जप्त केली आहे.
एमएच ३६ एच १०९ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाने गोंदिया जिल्ह्यातून दारू आणली जात असल्याची गोपणीय माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या पथकाला प्राप्त झाली. त्यानुसार पथकाने २९ एप्रिल रोजी आरमोरी मार्गावरील कठाणी नदी पुलाजवळ सापळा रचला. पोलिसांनी वाहनाला हात दाखविला मात्र वाहन थांबविले नाही. त्यामुळे सदर वाहनाचा पोलिसांनी खरपुंडी नाक्यापर्यंत पाठलाग करून वाहन पकडले. वाहनाची चौकशी केली असता वाहनात १ लाख ८० हजार रूपये किमतीच्या दारूच्या बॉटलचे ३० बॉक्स आढळले. वाहन चालकाला त्याचे नाव विचारले असता त्याने आपले नाव अजय रामसेवक असाटी(४६) रा. गोंदिया असे सांगीतले. त्याच्या बाजुला बसलेल्या इसमाने शुभम अशोक कुर्वे(२४) असे सांगीतले. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचबरोबर ७ लाख रूपये किमतीचे चारचाकी वाहनसुद्धा जप्त केले. दोघांची चौकशी केली असता सदर दारू गोंदिया येथील सोनू पंजवानी याच्या मालकीची आहे. मार्ग दाखविण्यासाठी राकेश बलेचा हा सुद्धा गडचिरोलीत आला असल्याचे सांगीतले. राकेश बलेचा याला इंदिरा गांधी चौकातून ताब्यात घेण्यात आले आहे. सोनू पंजवानी याच्या दारूविक्री संदर्भातील माहिती पोलीस घेत आहेत. या माहितीवरून पंजवानी याचे दारूचे साम्राज्य पोलिसांना माहिती पडणार आहे.
चौघांच्याही विरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर कारवाई एसडीपीओ पथकाचे एपीआय उद्धार, पोलीस हवालदार इरमलवार, नाईक पोलीस शिपाई गौरकार, सूरबसे, घोडाम यांनी केली.
दारूविक्रेते हादरले
कुरखेडा तालुक्यातील मालेवाडा पोलिसांनी २८ एप्रिल रोजी कारवाई करीत पीकअप वाहन व सात लाख रूपये किमतीची दारू जप्त केली. त्यामुळे कुरखेडा तालुक्यातील दारूविक्रेते हादरले आहेत. लपवून ठेवलेल्या दारूचा आणखी पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.