नऊ हजार शेतकऱ्यांची कृषी महोत्सवाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 11:44 PM2018-02-19T23:44:22+5:302018-02-19T23:44:38+5:30
आत्मा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कृषी व गोंडवन महोत्सवाला जिल्हाभरातील ८ हजार ५०० शेतकऱ्यांनी भेट देऊन शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, बचत गटांचे कार्य व दुधाळ जनावरांविषयीची माहिती जाणून घेतली.
आॅनलाईन लोकमत
गडचिरोली : आत्मा व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कृषी व गोंडवन महोत्सवाला जिल्हाभरातील ८ हजार ५०० शेतकऱ्यांनी भेट देऊन शेतीचे आधुनिक तंत्रज्ञान, बचत गटांचे कार्य व दुधाळ जनावरांविषयीची माहिती जाणून घेतली. या कृषी महोत्सवाचा सोमवारी समारोप करण्यात आला.
समारोपीय कार्यक्रमाला खा. अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, जिल्हाधिकारी शेखर सिंह, कृषी सभापती नाना नाकाडे, नगर पालिकेचे उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, रेखा डोळस, शालिनी रायपुरे, स्वप्नील वरघंटे, दामोधर अरगेला, प्राचार्य अमरशेट्टीवार, आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, ग्रामीण विकास यंत्रणेचे संचालक सुनील पठारे आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार अशोक नेते म्हणाले, महिला बचत गटाच्या उत्पादनाची विक्री व प्रदर्शन यासाठी महोत्सव हा अतिशय महत्त्वाचा टप्पा असल्याचे सिध्द झाले आहे. प्रत्येक प्रेक्षकाने वस्तू खरेदी करून बचत गटांचे उन्नतीकरण करण्यास सहकार्य केले. बचत गटांनी स्वयंरोजगार करून सक्षम बनावे, असे मार्गदर्शन केले.
आमदार डॉ. देवराव होळी यांनी मार्गदर्शन करताना शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढविता येते. जमिनीचा कस राखायचा असेल तर रासायनिक खताचा वापर कमी करावा लागेल. सेंद्रीय खताचा उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करावा. असे मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सेंद्रीय शेतीच्या उत्पादनाचा ब्रँड आपण तयार केला आहे. याचा फायदा जिल्ह्यातील शेतकºयांना होईल, असे मार्गदर्शन केले. प्रास्ताविकादरम्यान डॉ. प्रकाश पवार यांनी महोत्सवामुळे शेतकºयांच्या झालेल्या लाभाची माहिती दिली. संचालन केंद्रप्रमुख राजू वडपल्लीवार तर आभार आत्माच्या उपसंचालक प्रिती हिरळकर यांनी मानले.
दादाजी खोब्रागडे यांना जीवन गौरव पुरस्कार
एचएमटी सोना या उच्च प्रतीच्या धानाचे संशोधक दादाजी रामा खोब्रागडे रा. नांदेड, ता. नागभिड, जि. चंद्रपूर यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. दादाजी खोब्रागडे यांनी एमएचटी सोना या वानामुळे धान उत्पादनात क्रांती निर्माण झाली. दादाजी खोब्रागडे यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.