नऊ हजार मेट्रिक टन खत साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:32 AM2017-08-12T01:32:40+5:302017-08-12T01:33:02+5:30
जिल्हाभरातील ५०० खते विक्रेत्यांकडे सुमारे ८ हजार ८६४ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे २ हजार ८५९ मेट्रिक टन युरिया खताचा साठा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हाभरातील ५०० खते विक्रेत्यांकडे सुमारे ८ हजार ८६४ मेट्रिक टन खत उपलब्ध आहे. विशेष म्हणजे २ हजार ८५९ मेट्रिक टन युरिया खताचा साठा आहे.
पाऊस पडल्यानंतर पेरणीच्या कामांना सुरुवात होते. गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक धानाची रोवणी केली जाते. सुमारे दीड लाख हेक्टरवर धानपिकाची रोवणी होते. रोवणीच्या कालावधीतच शेतकरी धानपिकाला खत देत असल्याने या कालावधीत खताची मागणी वाढते. त्यामुळे या कालावधीत प्रत्येक खत विक्रेत्याकडे पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध असणे आवश्यक आहे. अन्यथा शेतकºयांची लूट होण्याची शक्यता निर्माण होते. याचा अनुभव जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला असल्याने रोवण्याच्या सुरुवातीलाच कृषी केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध करून दिले आहे. मागील हंगामातील ६ हजार ४०० मेट्रिक टन खत शिल्लक होते. त्यानंतर आणखी जवळपास २ हजार ४०० मेट्रिक टन खत यावर्षीच्या पावसाळ्यात मागविण्यात आले आहे. जिल्हाभरातील खत विक्रेत्यांकडे सद्य:स्थितीत २ हजार ८५९ मेट्रिक टन युरिया खत, ११८ मेट्रिक टन एमपीओ खत, ५६३ मेट्रिक टन डीएपी, १ हजार १२४ मेट्रिक टन एसएसपी, १ हजार २१० मेट्रिक टन संयुक्त खते, २ हजार ९८८ मेट्रिक टन मिश्रखते उपलब्ध आहेत.
धानपिकाच्या रोवणीला सुरुवात झाली आहे. रोवणीदरम्यान बहुतांश शेतकरी डीएपी, संयुक्त खते व मिश्रखतांचा वापर करतात. त्यामुळे हे खत पुरेशा प्रमाणात उपलब्ध असणे आवश्यक आहे. युरिया खताचा वापर धानपीक गर्भाशयात असताना केला जातो. युरिया खताची मागणी एकदम वाढत होती. त्याचबरोबर युरिया खताचा खत कंपन्या काळाबाजार करीत असल्याने या खताची टंचाई निर्माण होत होती.
मात्र मागील वर्षीपासूून युरिया खताला निमकोट लावण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. तेव्हापासून युरिया खताचा काळाबाजार कमी झाला आहे. त्यामुळे मागील वर्षीपासून युरिया खताचीही टंचाई जाणवत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
पॉस मशीनद्वारे अजूनही खतविक्री नाही
कृषी विभागाने जिल्हाभरातील खत विक्रेत्यांना पॉस मशीन उपलब्ध करून दिले आहेत. या पॉस मशीनच्या सहाय्यानेच खताची विक्री करायची आहे. अनेकांनी या मशीन सुरू केल्या आहेत. मात्र प्रत्यक्ष खतविक्री या मशीनच्या सहाय्याने होत नसल्याचे दिसून येत आहे. या मशीनमधूनच बिलाची सत्यप्रत निघत असल्याने अधिकची किंमत खत विक्रेते आकारू शकत नाही. त्यामुळे अनेक खत विक्रेते या मशीनच्या सहाय्याने खत विक्री करण्यास टाळाटाळ करीत आहेत. कृषी विभागाच्या अधिकाºयांनी संबंधित खत विक्रेत्यांना तंबी देऊन पीओएस मशीनच्या सहाय्यानेच खत विक्री करण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी होत आहे.