निर्भया पथक झाले अलर्ट; रात्री शहरात गस्ती वाढल्या !
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2024 01:53 PM2024-09-02T13:53:39+5:302024-09-02T13:59:09+5:30
Gadchiroli : महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या; महिलांना सुरक्षा प्रदान
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जानेवारी २०२२ मध्ये दिल्ली येथे घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये निर्भया पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाचे काम मागील काही दिवसात सुस्तावले होते. मात्र राज्यात अलीकडे घडत असलेल्या घटनांमुळे जिल्ह्यातील निर्भया पथके अलर्ट झाली आहेत.
दिल्ली येथे एका युवतीवर बसमध्ये झालेल्या बलात्काराच्या घटनेमुळे सारे समाजमन सुन्न झाले होते. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली होती. त्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न चर्चेला आला. महिलांना सुरक्षा प्रधान करण्यासाठी प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये निर्भया नावाने महिला पोलिस अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्याचे निर्देश शासनाने दिले.
काय आहे निर्भया पथक?
प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये निर्भया नावाने पोलिस अधिकाऱ्याचे पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात एक पोलिस अधिकारी व काही महिला पोलिस कर्मचारी यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावर व मोठ्या शहरांमध्ये या पथकाचे विशेष महत्त्व आहे. गस्त घालून महिला व बालकांना संरक्षण प्रदान केले जाते.
निर्भया पथकाचे काम कोणते?
ज्या ठिकाणी महिला किंवा मुलींचा वावर असतो अशा ठिकाणी निर्भया पथक गस्त घालत असते. या प्रामुख्याने शाळा-महाविद्यालये, ट्युशन क्लासेस, एखाद्या ठिकाणी महिलांची काम करण्याची जागा यांचा समावेश आहे. या पथकामुळे महिला किंवा मुलींना सुरक्षा प्रदान होण्यास मोठी मदत होते. पोलिस विभागावर इतरही कामांचा ताण आहे. त्यामुळे निर्भया पथकातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना इतर कामांची जबाबदारी सोपविली जाते. त्यामुळे गस्तीकडे दुर्लक्ष होते.
मध्यंतरी काम सुस्तावले
जानेवारी २०२२ मध्ये दिल्ली येथे घडलेल्या घटनेनंतर निर्भया पथकाची निर्मिती करण्याचे निर्देश शासनाने दिले होते. त्यानुसार पथके तयार करण्यात आली होती. मात्र या पथकाचे काम सुस्तावले होते. तालुकास्तरावर असलेल्या पोलिस स्टेशनमध्ये तर हे पथक नाहीच्या बरोबरच होते. या पथकाकडे इतर कामांची जबाबदारी सोपवली होती
या ठिकाणी विशेष लक्ष
महिलांना सुरक्षा प्रदान करणे हे पथकाचे सर्वांत महत्त्वाचे काम आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी महिलांचा वावर असते. त्या ठिकाणी सदर पथक गस्त घालत असते. प्रामुख्याने शाळा, महाविद्यालये, ट्युशन क्लासेस, बसस्थानक यांचा समावेश आहे. मोठ्या शहरांमध्ये रात्र पाळीत कारखान्यांमध्ये काम चालते. त्या ठिकाणी सुटी होण्याच्या वेळी निर्भया पथक तैनात असते.
सातत्य राहणार काय?
राज्यात महिला अत्याचाराची एखादी घटना घडल्यानंतर पोलिस विभागाला निर्भया पथकाची जाणीव होते. इतर वेळेवर मात्र या पथकाचा विसर पडते. पोलिस विभाग अलर्ट राहत नसल्याने याचा गैरफायदा समाजकंठकांकडून घेतला जाते. त्यांच्याकडून अत्याचाराची घटना घडून येत असल्याचे दिसन येते.