नत्र व स्फुरदचे प्रमाण घटतेय!
By admin | Published: August 1, 2015 01:13 AM2015-08-01T01:13:05+5:302015-08-01T01:13:05+5:30
सेंद्रिय खताऐवजी रासायनिक खतांचा वाढत चाललेला वापर तसेच जास्तीची घेतली जाणारी पिके यामुळे दिवसेंदिवस जमिनीतील नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी होत...
लोकमत विशेष
भविष्यात धोक्याची घंटा : मृद चाचणीतील अहवाल; सेंद्रिय खताचा वापर घटल्याचा परिणाम
दिगांबर जवादे गडचिरोली
सेंद्रिय खताऐवजी रासायनिक खतांचा वाढत चाललेला वापर तसेच जास्तीची घेतली जाणारी पिके यामुळे दिवसेंदिवस जमिनीतील नत्र व स्फुरदचे प्रमाण कमी होत चालले असून भविष्यात शेतकऱ्यांसाठी धोक्याची घंटा असल्याचे मृद तपासणीतून दिसून आले आहे.
माती परीक्षण मशीन वर्षभरापासून बंद
झिंक, तांबे, लोह, मंगल, कॅल्शीअम कार्बोनेट, सोडियम आदी सुक्ष्म घटक द्रव्यांची तपासणी मशीनच्या माध्यमातून करण्यात येते. मात्र ही मशीन मागील वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे येथील सुक्ष्म द्रव्यांचे परीक्षण चंद्रपूर येथील प्रयोगशाळेत पाठवून केले जात आहे. सुक्ष्म द्रव्यांची तपासणी करण्यासाठी एप्रिल महिन्यापासून २ हजार ५४९ नमुने जिल्हा मृद तपासणी प्रयोगशाळेला प्राप्त झाले आहेत. मात्र यातील एकाही नमुन्यांची आजपर्यंत तपासणी करण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
नत्र व स्फुरदचे प्रमाण वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीमध्ये जास्तीत जास्त सेंद्रिय खताचा वापर करावा. घटत चालले नत्र व स्फुरदचे प्रमाण जमिनीच्या आरोग्यसाठी धोक्याचे आहे. शेतकऱ्यांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. सुक्ष्म द्रव्यांचे माती परीक्षण करणाऱ्या मशीनची दुरूस्ती करण्यात यावी. याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. मात्र अजुनपर्यंत मशीन दुरूस्त करणारे तांत्रिक कर्मचारी उपलब्ध झाले नाही.
- ए. एम. तलवाडे,
जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी
झिंक व लोहाचे प्रमाण कमी
जिल्ह्यातील जमिनीमध्ये नत्र व स्फुरद यांच्या बरोबरच झिंक व लोहाचे प्रमाण कमी असल्याचेही आढळून आले आहे. त्यामुळे शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना झिंक व फेरस सल्फेटचे वितरण करण्यात येत आहे. सुक्ष्म द्रव्यांमध्ये तांबे, मंगल, कॅल्शीअम कार्बोनेट व सोडीयमचे प्रमाण सर्वसाधारण असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर सामू, क्षारता, सेंद्रिय कार्बन, पालाश यांचेही प्रमाण सर्वसाधारण असल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात आम्लाचे प्रमाण आढळून आले आहे. त्या शेतकऱ्यांना चूना किंवा चूनखडीचा वापर करण्याची शिफारस प्रयोग शाळेच्या मार्फतीने करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांमध्ये जागृतीची गरज
प्रत्येक शेतकऱ्याला स्वत:च्या जमिनीमध्ये कोणते घटकद्रव्ये आहेत, याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीचे माती परीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे. कृषी विभागाच्या मार्फतीने माती परीक्षण करून दिले जाते. मात्र त्याचे प्रमाण मर्यादित आहे. शेतकऱ्याने स्वत: माती परीक्षण करून घेतले तर त्यासाठी केवळ २७५ एवढे शुल्क आकारले जाते. तपासणी नंतर होणारे फायदे लक्षात घेता तपासणीचा खर्च नगण्य आहे. शेतकऱ्यांना जी आरोग्य पत्रिका देण्यात येते, त्यामध्ये काही सूचना दिलेल्या असतात. त्या सूचना कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी योग्य पध्दतीने शेतकऱ्यांना समजावून देणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र असे होताना दिसत नाही. त्यामुळे आरोग्य पत्रिका शेतकऱ्यांच्या दृष्टीने एक अनावश्यक कागद बनते.