अबब..... ६८ कि.मी.चे अंतर कापण्यासाठी ११२ कि.मी.चा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2022 12:13 PM2022-02-05T12:13:57+5:302022-02-05T12:20:55+5:30
जिल्हा निर्मितीला ३९ वर्षे होऊनही ६८ किमीच्या अंतरासाठी आष्टी-आल्लापल्ली मार्गे एट्टापल्ली ११२ कि.मी.चा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना अंदाजे ४४ कि.मी. जादाचा प्रवास करण्याची पाळी आली आहे.
गडचिरोली : चामोर्शी - एट्टापल्ली व्हाया घोट, देवदा या मार्गावर अडसर असलेल्या देवदा जवळील दिना नदीवर अजूनही पूल झाला नाही. जिल्हा निर्मितीला ३९ वर्षे होऊनही ६८ किमीच्या अंतरासाठी आष्टी-आल्लापल्ली मार्गे एट्टापल्ली ११२ कि.मी.चा प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना अंदाजे ४४ कि.मी. जादाचा प्रवास करण्याची पाळी आली आहे.
नागरिकांची अडचण लक्षात घेऊन दिना नदीवर देवदा नजीक पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य भाजप शिक्षक आघाडीचे सदस्य विजय कोमरवार यांनी खासदार अशोक नेते यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जिल्ह्यातील काही भाग अद्यापही रस्ते विकासात मागे असल्याचे चित्र आहे.
त्यातीलच चामोर्शी व्हाया घोट, एट्टापल्ली हा ६८ कि.मी.चा मार्ग असून, या मार्गावर घोट, निकतवाडा, नवेगाव, पोतेपल्ली, माडे आमगाव, पुसंगुड्डा, रेगडी, देवदा, बोलेपल्ली, चंदनवेल्ली, गेदा, जीवनगट्टा, एट्टापल्ली अशी जवळपास १२ गावे येतात. आल्लापल्ली - आष्टी मार्गाचे अंतर अधिक असल्याने वाहनधारक या जवळच्या मार्गाचा अवलंब करतात; मात्र पावसाळ्यात या नदीवरील घोट बाजूचा घाट दुरुस्त नसल्यामुळे जीव मुठीत धरून वाहन हळूहळू काढावे लागते.
हिवाळा व उन्हाळ्यात हा मार्ग वाहनधारकांना परवडण्यासारखा असल्याने वाहनधारक या मार्गाचा अवलंब करतात. नाल्यावर पाणी असल्यास वाहतूक बंद असते. पाणी नसल्यास त्या मार्गाने दुचाकी, चारचाकी व मालवाहतूक वाहने मोठ्या प्रमाणात याच मार्गाचा उपयोग करतात. तसेच एट्टापल्लीकडून गडचिरोलीकडे जाणारे वाहनधारक जवळचा मार्ग म्हणून घोट-पोटेगाव मार्गाने जातात. देवदा नजीक पुलाची निर्मिती करून परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी खा. नेते यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाची प्रत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रसाद नड्डा व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही पाठविण्यात आली आहे.
हा मार्ग साेयीस्कर
दिना नदी लहान असल्याने पुलावर येणारा खर्च कमी येऊ शकतो. या मार्गावरून चामोर्शी किंवा गडचिरोली येण्यासाठी ४४ कि.मी.चा अधिक प्रवास करून मानसिक व आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. जिल्हा पोलीस विभागाच्या पोलीस पथकांना नेहमीच एटापल्ली, भामरागड , अहेरीकडे पेट्रोलिंगसाठी जावे लागते त्यादृष्टीने त्यांना अत्यंत जवळचा रस्ता ठरू शकतो. अनेक शासकीय कामासाठी जिल्हास्थळी येण्यासाठी कमी अंतराचा प्रवास करण्यासाठी वाहतुकीसाठी देवदा नाल्यावर पुलाचे बांधकाम हाेणे आवश्यक आहे.