पीक विमा याेजनेतून नुकसान भरपाई मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:56 AM2021-01-08T05:56:26+5:302021-01-08T05:56:26+5:30
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात २७ ते ३१ ऑगस्टदरम्यान वैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतजमिनी पुराखाली ...
देसाईगंज : देसाईगंज तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात २७ ते ३१ ऑगस्टदरम्यान वैनगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे नदीकाठावरील शेतजमिनी पुराखाली आल्याने येथील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. दरम्यान, या घटनेला चार महिन्याचा कालावधी उलटूनही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे.
संजय सरोवर व गोसेखुर्द धरणाचे पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात आल्याने आलेल्या महापुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नदीकाठावरील तब्बल १७ हजार ३३ हेक्टरपेक्षा जास्त शेतजमिनी पुराखाली आल्याने येथील शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पीक विम्याची रक्कम संबंधित बँका तसेच तालुका कृषी कार्यालयामार्फत शासनाकडे जमा केली आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे ३५ टक्के नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पैसेवारीच्या निकषानुसार संपूर्ण नुकसान भरपाई देण्याचे अधोरेखित करण्यात आले हाेते. पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करून कर्जदार शेतकऱ्यांच्या थेट कर्ज खात्यातून तर बिगर कर्जदारांना ऐच्छिक पद्धतीने पीक विमा काढण्यास भाग पाडण्यात आले होते.
दरम्यान, शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होऊनही व स्थानिक तलाठ्यांमार्फत मोका चौकशी करून पीक नुकसानीचा अहवाल मागविण्यात येऊनही सदर शेतकऱ्यांनी याबाबत संबंधित बँक अधिकाऱ्यांना विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत.
पूरबाधित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ संपूर्ण पीक कर्ज माफ करण्यासह प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत तात्काळ नुकसान भरपाई अदा करण्याची मागणी देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे.
फाेटाे : तहसीलदारांना निवेदन देताना शेतकरी.