‘महाज्याेती’चा शेतकऱ्यांना इंगा; १० महिने उलटूनही अर्थसाहाय्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2022 02:07 PM2022-08-08T14:07:03+5:302022-08-08T14:08:30+5:30
करडई लागवड : एकरी खर्च तर साेडाच, हार्व्हेस्टिंगही केले नाही
पुंजीराम मेश्राम
वडधा (गडचिरोली) : तेलबिया लागवडीतून अधिकाधिक गळीत धान्याचे उत्पादन घेता यावे, यासाठी मागील वर्षी शेतकऱ्यांना माेफत करडईचे बियाणे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूरमार्फत वाटप करण्यात आले. करारनाम्यानुसार लागवड प्राेत्साहन अनुदान व काढणीसाठी यंत्रसाहाय्य देण्याचे ठरले हाेते; परंतु लागवडीपासून १० महिन्यांचा व काढणी केल्यानंतर तीन महिन्यांचा कालावधी उलटला; पण अद्याप अर्थसाहाय्य मिळाले नाही. ‘महाज्याेती’ने शेतकऱ्यांना इंगा तर दाखविला नाही ना, असा सवाल शेतकरी करीत आहेत.
तेलबिया (करडई) उत्पादन, प्रक्रिया व विक्री कार्यक्रम - २०२१ अंतर्गत तेलबिया उत्पादन व प्रक्रिया उद्योगात असणारी संधी विचारात घेऊन व शासनाच्या खाद्यतेल धोरणाला अनुसरून महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूरमार्फत इतर मागासवर्ग, विमुक्त भटक्या जाती-जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील (नॉन क्रिमिलेयर गट) शेतकऱ्यांकरिता तेलबिया उत्पादन व प्रक्रिया प्रकल्प रबी-२०२१ च्या हंगामात चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील ३ क्लस्टरद्वारे राबविण्यात आला होता. सदर योजनेत राज्य शासनाचा कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र व शेतकरी उत्पादन कंपन्यांमार्फत करडई पीक घेण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यात आले होते. शेतकऱ्याला महाज्योतीमार्फत मोफत बियाणे तसेच खते, कीटकनाशके, जिवाणू खते व इतर लागवड खर्च आदींकरिता डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २ हजार २०० रुपये प्रति एकरी अर्थसाहाय्य जमा करण्यात येईल, असे सांगण्यात आले.
शेतकऱ्यांनी स्वत: केला खर्च
शेतकऱ्यांकडून तयार करडई उत्पादनाचे जानेवारी-फेब्रुवारी २०२२ मध्ये शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमाने ट्रॅक्टर, माउंटेड हार्व्हेस्टर लावून काढणी व मळणी करण्यासाठी लागणारा अंदाजित खर्च एकरी ८०० ते १००० शेतकऱ्याला स्वतः करावा लागला.
या योजनेंतर्गत शेतकऱ्याने उत्पादित केलेली करडई (तेलबिया) महाज्योती नागपूरद्वारे शासनाच्या सन २०२१ करिता मंजूर आधारभूत दराने खरेदी करण्याचे ठरविले. मात्र, खरेदी केली नाही.
कशी हाेती याेजना?
शेतकऱ्यांनी उत्पादित केलेली करडई स्वखर्चाने महाज्योतीच्या खरेदी केंद्रावर आणून द्यावी लागेल. करडई खरेदीनंतर त्यांची वाहतूक, साठवण, तेल काढणे, तेलाची ग्रेडिंग (प्रतवारी), पॅकेजिंग इत्यादी सर्व कामे महाज्योतीकडून करण्यात येणार हाेती. उत्पादित तेलाच्या विक्रीतून प्राप्त निव्वळ नफा या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना त्यांनी उत्पादित केलेल्या करडई बियांच्या प्रमाणात प्रो-राटा तत्त्वावर वाटप करण्यात येणार होता.