चामोर्शी तालुक्यात अग्निशमन यंत्रणाच नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 11:53 PM2019-05-31T23:53:35+5:302019-05-31T23:54:16+5:30
चामोर्शी शहरासह तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून तापमान वाढले आहे. शिवाय कचरा जाळण्याच्या माध्यमातूनही शहरासह तालुक्यात आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सातत्याने मागणी होऊनही शासनाने चामोर्शी शहर व तालुक्यासाठी अग्निशमन यंत्रणा अद्यापही उपलब्ध करून दिली नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी शहरासह तालुक्यात गेल्या १५ ते २० दिवसांपासून तापमान वाढले आहे. शिवाय कचरा जाळण्याच्या माध्यमातूनही शहरासह तालुक्यात आग लागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सातत्याने मागणी होऊनही शासनाने चामोर्शी शहर व तालुक्यासाठी अग्निशमन यंत्रणा अद्यापही उपलब्ध करून दिली नाही. परिणामी आग वेळेवर आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न होत नसल्याचे दिसून येत आहे.
चामोर्शी तालुक्यात मे महिन्यात आग लागून किराणा दुकान जळाल्याची घटना घडली. कुनघाडा मार्गावर शेतातील कचरा जाळताना तणसीचे ढिगही जळून पशुंच्या वैरणाची होळी झाली. अलिकडेच चामोर्शी शहरात लक्ष्मी गेट परिसरात सलुनचे दुकान व पानठेला जळून खाक झाल्याची घटना घडली. तालुक्याच्या बोरी येथे शेतशिवारातील तणसीचे अनेक ढिगही जळाले. यंदाच्या उन्हाळ्यात चामोर्शी शहरासह तालुक्यात आग लागून हजारो रुपयांचे नुकसान झाल्याच्या बऱ्याच घटना घडल्या. दरवर्षीच्या उन्हाळ्यात तालुक्यासह शहरात आग लागण्याच्या अनेक घटना घडत असतात. मात्र या घटनांना आळा घालण्यासाठी पाहिजे त्या प्रमाणात उपाययोजना करण्यात येत नाही.
चामोर्शी नगर पंचायतीकडे अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था नाही. त्यामुळे गडचिरोली, अहेरी व मूल या तीन ठिकाणावरून अग्निशमन वाहन व मनुष्यबळ बोलवावे लागते. या तिनही शहराचे अंतर दूर असल्याने हे वाहन घटनास्थळी पोहोचेपर्यंत घटनास्थळी काहीच उरत नाही. आगीच्या रौद्ररूपात अनेक साहित्य जळून खाक होतात.
चामोर्शी नगर पंचायतीचे मुख्याधिकारी संजय गंगथडे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, मी रजेवर आहे. अग्निशमन यंत्रणेचा प्रस्ताव आहे किंवा नाही, यासंदर्भात आपण सोमवारी माहिती देऊ, असे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
नगर पंचायतीला अग्निशमन यंत्रणा देण्याची मागणी
चामोर्शी तालुक्यात एकूण ७६ ग्रामपंचायती असून ११४ गावे आहेत. सर्वाधिक नऊ जिल्हा परिषद क्षेत्र असून दोन लाखांवर लोकसंख्या आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या तालुक्यात आग लागण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. या घटनेतील आग विझविण्याच्या उद्देशाने नगर पंचायत प्रशासनाला शासनाने अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे. सदर मागणीला घेऊन नगर पंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी सरकारकडे पाठपुरावा केल्यास अग्निशमन वाहन उपलब्ध होऊ शकते. अग्निशमन वाहन उपलब्ध झाल्यास आग आटोक्यात आणून लाखो रुपयांची नुकसान टाळू शकता येते. यासाठी राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीची गरज आहे.