सहा वर्षांपासून पशुधन विकास अधिकारी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:26 AM2021-07-18T04:26:32+5:302021-07-18T04:26:32+5:30
येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत ग्रामविकास अधिकारी एन. एस. घुटके यांचे कोरची तालुक्यातील कोटगुल येथे बदली झाल्यानंतर मागील दोन-तीन वर्षांपासून ...
येथील ग्रामपंचायत कार्यालयात कार्यरत ग्रामविकास अधिकारी एन. एस. घुटके यांचे कोरची तालुक्यातील कोटगुल येथे बदली झाल्यानंतर मागील दोन-तीन वर्षांपासून वैरागड ग्रामपंचायतीमध्ये प्रभारी ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती केली जाते. मागील दोन वर्षांत पाच प्रभारी ग्रामसेवक बदलून झाले. सध्या सुकाळा ग्रामपंचायतीचे राऊत यांच्याकडे प्रभार आहे. तसेच येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात कार्यरत कनिष्ठ अभियंता एन. एम. भोवरे यांची एक वर्षापूर्वी गडचिरोली येथे बदली झाली तेव्हापासून येथील विद्युत कार्यालयाचा भार आरमोरी येथील कनिष्ठ अभियंता आलोक भोयर यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे इतर गावांचा वीज वितरणाचा व्याप जास्त असल्याने वैरागड कार्यालयात भोयर हे फार कमी वेळा हजर राहात असल्याने वैरागड आणि परिसरात सतत ग्राहकांना वीज समस्येचा सामना करावा लागतो. वैरागड वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात ५२ गावांचा समावेश असून, केवळ सहा कर्मचारी कार्यरत आहेत. किमान वैरागड येथे कनिष्ठ अभियंता तरी पूर्णवेळ देण्यात यावा, अशी ग्राहकांची मागणी आहे.
वैरागड येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात मेंढेबोडी, पाटणवाडा, मोहझरी, सुकाळा, करपळा, चामोर्शी येथील पशुपालक आपले आजारी जनावरे उपचारांसाठी आणतात, पण मागील पाच वर्षांपासून वैरागड येथे पशुवैद्यकीय दवाखाना परिचर चालवीत आहेत. येथील कार्यालयात कार्यरत पशुधन विकास अधिकारी विक्की गणवीर यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर या रिक्त जागेवर मागील पाच-सहा वर्षांपासून पशुधन विकास अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नाही. वैरागड आणि परिसरातील आजारी जनावरांना परिचराकडून उपचार करून घ्यावा लागतो. त्यामुळे वैरागड येथील ग्रामविकास अधिकारी, विद्युत कनिष्ठ अभियंता व पशुधन अधिकारी यांची पूर्णवेळ नियुक्ती करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.