साहित्य खरेदीत गैरव्यवहार झाला नाही
By admin | Published: November 6, 2016 01:40 AM2016-11-06T01:40:21+5:302016-11-06T01:40:21+5:30
आंबेशिवणी ग्रामपंचायतीसाठी थोड्या अधिक किंमतीच्या वस्तू खरेदी करण्यात आल्या असल्या तरी त्या वस्तूंचा दर्जा अतिशय चांगला आहे.
पत्रपरिषद : आंबेशिवणीच्या सरपंचाची माहिती
गडचिरोली : आंबेशिवणी ग्रामपंचायतीसाठी थोड्या अधिक किंमतीच्या वस्तू खरेदी करण्यात आल्या असल्या तरी त्या वस्तूंचा दर्जा अतिशय चांगला आहे. त्यामुळे साहित्य खरेदीत कोणताही गैरव्यवहार झाला नाही. योगाजी कुडवे यांनी केलेले आरोप चुकीचे असून पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर आपल्याला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत, अशी माहिती आंबेशिवणी ग्रामपंचायतीचे सरपंच माणिक झंझाळ यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
ग्रामपंचायतीने संगणक खरेदीदरम्यान मासिक सभेत ठराव घेऊन पुरवठादाराकडून दरपत्रक मागितले होते. कमी दर असलेल्या पुरवठादाराकडून संगणक खरेदी करण्यात आले. सदर संगणक चांगल्या कंपनीचा आहे. संगणकासोबत एकाच ठिकाणी प्रिंटर, झेरॉक्स, स्कॅनरची सुविधा असलेली मशीन खरेदी करण्यात आली. ग्रामपंचायतसमोर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. या कामाचे १ लाख ४९ हजार ३८० रूपयांचे अंदाजपत्रक ग्रामपंचायतीला प्राप्त झाले. त्यानुसार काम पूर्ण करण्यात आले. कामाचे मूल्यांकन मात्र १ लाख ६६ हजार ४२ रूपयांचे झाले. प्रत्यक्ष ग्रामपंचायतीने मात्र १ लाख ४९ हजार ३८० रूपयेच खर्च केले आहेत. ग्रामपंचायतमधील प्रत्येक वस्तूंची खरेदी मासिक सभेदरम्यान ठराव घेऊनच केली जाते. यादरम्यान दरपत्रकेसुद्धा ग्रामपंचायत सदस्यांसमोर ठेवली जातात. ग्रामपंचायतीचा संपूर्ण व्यवहार अतिशय पारदर्शकपणे सुरू आहे. आंबेशिवणी ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा योजना विद्युत बिल थकल्याने बंद होती. ग्रामपंचायतीने लोकवर्गणीतून २४ हजार रूपये जमा केले व नळ योजनेचे विद्युत बिल भरले. तेव्हापासून नळ योजना अतिशय सुस्थितीत सुरू आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत अनेक विकासकामे झाली आहेत. मात्र अनावश्यक तक्रारी करून विकासकामात अडथळे निर्माण केले जात आहेत. करण्यात आलेले आरोप निराधार असून योगाजी कुडवे जनतेचीही दिशाभूल करीत आहेत, असा आरोप माणिक झंझाळ यांनी पत्रकार परिषदेतून केला.
पत्रकार परिषदेला विलास म्हशाखेत्री, देविदास आत्राम, घनश्याम म्हशाखेत्री, घनश्याम गावतुरे उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)