नो वन किल्ड शांताबाई ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 12:25 AM2019-07-21T00:25:42+5:302019-07-21T00:26:33+5:30
कुरमा घर. गोंड आदिवासी समाजातील महिलांसाठी म्हटलं तर विसावा, कम्फर्ट झोन आणि म्हटलं तर एक फसवा तुरु ंग. मासिक पाळीच्या दिवसात स्त्री ला स्पर्श न करणे हा टॅबू भारतासह अनेक देशात प्रचलित आहेत. त्यामुळे गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात हा प्रकार नसला तरच नवल.
गडचिरोली : कुरमा घर. गोंड आदिवासी समाजातील महिलांसाठी म्हटलं तर विसावा, कम्फर्ट झोन आणि म्हटलं तर एक फसवा तुरु ंग. मासिक पाळीच्या दिवसात स्त्री ला स्पर्श न करणे हा टॅबू भारतासह अनेक देशात प्रचलित आहेत. त्यामुळे गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आदिवासी भागात हा प्रकार नसला तरच नवल. येथील गोंड आदिवासी समाजाने त्यावर ‘कुरमा घर’ हा उपाय शोधून काढला आहे. पाळीच्या दिवसांत स्त्री ला आराम मिळावा (सक्तीचा), यासाठी प्रत्येक आदिवासी गावात कुरमा घर गावाबाहेर बांधले जातात. हे कुरमा घर चांगले की वाईट यात अनेक मत-मतांतरे आहेत. या वादावर नंतर बोलूया. पण गर्भपात करून घेण्याच्या प्रयत्नात रक्तस्त्राव झाल्याने कुरमा घरात पडून राहात गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील पवनी गावच्या शांताबाई किरंगे या महिलेने स्वत:चा मृत्यू ओढवून घेतला.
तिचं वय वर्ष केवळ २६. दोन मुली पदरी. तिसऱ्यांदा गर्भवती राहिली. मुल नको असल्याने उपाय म्हणून छत्तीसगड राज्यातील मानापूर येथे मावशीकडे गेली. तिने गावठी औषध दिले. ते घेऊन शांताबाई गावी आली. रात्री औषध घेतलं. या औषधाने सकाळी तिला रक्तस्त्राव होऊ लागला. रक्तस्त्राव म्हणजे पाळी आली असणार हाच समज करून ती कुरमा घरात गेली. ही जागा गावाच्या एका टोकावर. वीज, पाणी अशा कुठल्याही सुविधा नाही. रक्तस्त्राव वाढत राहिला. पण विटाळाची भावना असल्याने कुणाला आवाज न देता ती तशीच पडून राहिली. दुपारी तिची लहानशी मुलगी डबा घेऊन गेली. आईच्या कुशीत सामावण्याची सहज भावना तिला झाली असणार. पण तिची आई निपचित पडलेली होती. कुठलीही हालचाल करीत नव्हती. ती धावत घरी गेली. घरच्यांना हा प्रकार सांगितला. घरच्यांनी जाऊन बघितले असता तिचा मृत्यू झाला होता. पण वाईट गोष्ट ही की मृत्यूनंतरही शांताबाईचा विटाळ संपला नव्हता. कुरमा घरात पुरु षांना जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे महिलांनीच तिला बाहेर काढले. आता प्रश्न पडतो तो शांताबाईचा बळी कशामुळे गेला? तिने घेतलेल्या गावधी औषधामुळे की विटाळ असल्याने केवळ अस्पर्शित राहिल्यामुळे. वैद्यकीय मदत मिळाली असती किंवा त्यासाठी तिने स्वत: प्रयत्न केले असते तरी ती वाचू शकली असती असा विचार कुणाच्याही मनात आता नक्कीच येणार. पण शांताबाईचा आता मृत्यू झाल्यामुळे या जर-तर ला काहीही अर्थ नाही.
पाळी येऊन रक्तस्त्राव होणं हे स्त्री ला स्त्रीत्व बहाल करतं. पण त्याला विटाळाची काळी किनारही आहे. येथे पुन्हा स्त्री आणि पुरु ष हे द्वंद्व दिसतंच. या सर्व घटनेमध्ये पुरु ष कुठेही दिसत नसला तरी यामागचा करता करविताही पुरु षच. शांताबाई गर्भवती राहिली ती नवºयामुळे. पण गर्भपात करायचा आहे हे म्हणण्याची उघड सोय नवºयासमोर नसल्याने स्वत:च त्यावर उपाय शोधत राहिली. पोलीस तक्र ार करून तिच्या नवºयाने आणि आकस्मिक मृत्यूची नोंद करून पोलिसांनी आपले ‘कर्तव्य’ पार पाडले. गुन्हा आकस्मिक असल्याने पुढे फार चौकशी होणार नाही हे ओघाने आलेच. वैद्यकीय सेवेचा लाभ न मिळाल्यामुळे, किंबहुना तो घेऊ न शकल्याने शांताबाई मेली असं वाक्य कुणाच्याही तोंडून सहज निघेल. पण या ग्रामीण भागात तिला आकस्मिक आरोग्य सेवा मिळाली असती का? हा प्रश्न देखील आहेच. पण समाजाला चिकटलेल्या एका प्रथेमुळे तिचा मृत्यू झाला हे उघड सत्य आहे. मेल्यावरही या अस्पर्शित प्रथेतून तिची सुटका झाली नाही. त्यामुळे तिच्या मृत्यूची वैद्यकीय कमी सामाजिक कारणेच अधिक आहेत. ती शोधून त्यावर चर्चा करावीच लागेल. चला चर्चेला सुरु वात करूया. अन्यथा एकच गोष्ट म्हणावी लागेल, ‘नो वन किल्ड शांताबाई...’