पाय ठेवायला जागा नाही; वाहन कोठे ठेवणार ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2024 02:12 PM2024-09-16T14:12:51+5:302024-09-16T14:13:57+5:30
Gadchiroli : गणेश मंडपाजवळ गर्दी, वाहन चोरीचा धोका
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी उसळत आहे. प्रत्येक भाविकाचे कुटुंब दुचाकी किंवा चारचाकीवर येते. वाहने ठेवण्यासाठी गणेश मंडळांकडे पार्किंगची व्यवस्था नाही. परिणामी, वाहने भर रस्त्यावरच उभी केली जातात. यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होण्याची शक्यता असते. तसेच वाहन चोरीला जाण्याची शक्यता असते.
सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत विविध प्रकारचे देखावे, आकर्षक रोषणाई केली जाते. ही रोषणाई व देखावे बघण्यासाठी शहर तसेच ग्रामीण भागातील नागरिक येतात.
इंदिरा गांधी चौकी : इंदिरा गांधी चौकात असलेल्या विश्रामगृहात गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या ठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मार्गावरच वाहने उभी केली जातात.
रेड्डी गोडावून चौक : शहरातील रेड्डी गोडावून चौकातही सार्वजनिक उत्सव मंडळामार्फत गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सदर ठिकाण शहराच्या आतील भागात आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केली जातात.
आरमोरी मार्ग : गडचिरोली शहरातील आरमोरी मार्गावर गणेश मंडपात शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित देखावा तयार करण्यात आला आहे. सदर देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळते. या ठिकाणी येणारे भाविक थेट रस्त्यावरच वाहने ठेवतात. या मार्गावरून वाहनांची वर्दळ असते, हे विशेष
घरगुती गणपतीचे विसर्जन जोरात
घरगुती गणपतीच्या विसर्जन जोरात केले जात आहे. संदल, बँडपार्टी, डीजेच्या तालावर वाजत-गाजत मिरवणूक काढली जात आहे. या मिरवणुकीत शेकडो जण सहभागी होत असल्याने वाहतुकीची कोंडी होत असते.