ना सॅनिटायझर, ना चेहऱ्यावर मास्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 05:00 AM2020-08-12T05:00:00+5:302020-08-12T05:00:52+5:30
सार्वजनिक व्यवहार सुरू करताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदारांपासून बँकांपर्यंत सर्वांसाठी सूचनावली जाहीर केली आहे. त्यात सॅनिटायझर ठेवणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियम अत्यावश्यक आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्या सूचनांचे काटेकोर पालन न केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हाही दाखल होऊ शकतो, अशा इशारा देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात दिवसागणिक कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आतापर्यंत कोरोनाबाधितांचा आकडा ७५० पेक्षा वर गेला आहे. मात्र कोरोनाच्या या वाढत्या आकड्यासोबत नागरिकांमधील बिनधास्तपणा आणि बँकांसारख्या जबाबदार घटकांचा बेजबाबदारपणाही वाढत असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या पाहणीत स्पष्टपणे दिसून आले. दिवसभरात शेकडो लोकांचा संपर्क येऊन बटनांना थेट स्पर्श होणाºया बँकांच्या एटीएममध्ये साधे सॅनिटायझर ठेवण्याचे सौजन्यही बहुतांश बँकांनी दाखविलेले नाही.
विशेष म्हणजे याबाबत आजपर्यंत कोणीही बँकांकडे तक्रार केलेली नाही. उलट स्वत:च विनामास्क येऊन एटीएममधील व्यवहार करून बिनधास्त पुढच्या कामाला लागणाऱ्यांचे प्रमाण अर्ध्यापेक्षा जास्त होते. त्यामुळे हे बिनधास्त नागरिक कोरोनाचे वाहक तर होणार नाही ना, अशी शंका निर्माण होत आहे. सार्वजनिक व्यवहार सुरू करताना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांनी दुकानदारांपासून बँकांपर्यंत सर्वांसाठी सूचनावली जाहीर केली आहे. त्यात सॅनिटायझर ठेवणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे आदी नियम अत्यावश्यक आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी त्या सूचनांचे काटेकोर पालन न केल्यास साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हाही दाखल होऊ शकतो, अशा इशारा देण्यात आला आहे. मात्र कोणावर कारवाईच होत नसल्यामुळे सामान्य नागरिकांसोबत आता बँकांसारखे जबाबदार घटकही बिनधास्त झाले आहेत.
कळते पण वळत नाही अशी सर्वांची स्थिती
सर्वाधिक व्यवहार होणाऱ्या स्टेट बँक आॅफ इंडियाच्या एटीएममध्ये कोणीही सुरक्षा रक्षक नव्हता आणि सॅनिटायझरचीही व्यवस्था नव्हती. काही लोक नाकातोंडावर मास्क किंवा रूमाल लावून येत होते, पण जास्तीत जास्त लोक याबाबतीत बिनधास्त होते. कोरोनाच्या स्थितीचा त्यांच्यावर कोणताही परिणाम दिसून येत नव्हता. हीच स्थिती बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि युनियन बँक यांच्या एटीएममध्ये दिसून आली. काही नागरिकांना या बिनधास्त वागण्याबद्दल हटकले असता किती वेळा सॅनिटायझर लावणार? असा प्रश्नार्थक सूर व्यक्त करत त्यांनी एटीएममध्ये सॅनिटायझर नसल्याबद्दल कोणतीही हरकत घेण्यास नकार दिला. बहुतांश लोकांनी मात्र सॅनिटायझर असायला हवे असे सांगत ते असते तर वापर केला असता. पण नाही म्हणून कोणाकडे तक्रार करणार नाही, तेवढा वेळ कोणाला आहे? असे म्हणून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
जिल्हा बँक आणि अॅक्सिस बँकेचे एटीएम सुसज्ज
गडचिरोली शहरात कार्यरत असणाऱ्या विविध बँकांमध्ये लोकमत चमुने प्रत्यक्ष पाहणी केली असता केवळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि अॅक्सिस बँक या दोनच बँकांच्या एटीएम मध्ये कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचे दिसून आले. जिल्हा बँकेच्या एटीएमबाहेर सुरक्षा रक्षक आणि आतमध्ये सॅनिटायझरची बाटलीही होती. पण मोजकेच लोक त्याचा वापर करत होते. अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये व्यवहार आटोपल्यानंतर सुरक्षा रक्षक आपल्या हाताने सॅनिटायझर देत होता.
स्टेट बँकेच्या प्रत्येक एटीएममध्ये आधी तीन सुरक्षा रक्षकांची आळीपाळीने २४ तास ड्युटी रहायची. पण वरिष्ठ स्तरावरूनच सुरक्षा रक्षकांची सेवा बंद करण्यात आली. आम्हाला आमच्या स्तरावर एटीएम मध्ये, बँकेत सॅनिटायझर ठेवण्याचा अधिकार आहे. त्याबाबत योग्य ती खबरदारी घेऊ पण नागरिकांनीही आपली जबाबदारी निट सांभाळली पाहीजे.
- एस.एफ.येसनसुरे,
शाखा व्यवस्थापक, एसबीआय गडचिरोली