ग्रामसेवकांचे असहकार आंदोलन सुरूच
By admin | Published: May 5, 2017 01:12 AM2017-05-05T01:12:21+5:302017-05-05T01:12:21+5:30
संवर्ग विकास अधिकारी सपाटे यांचे स्थानांतरण करावे, या मुख्य मागणीसाठी तालुक्यातील ग्रामसेवकांनी
मासिक सभेवर बहिष्कार : संवर्ग विकास अधिकाऱ्यांच्या स्थानांतरणाची मागणी
धानोरा : संवर्ग विकास अधिकारी सपाटे यांचे स्थानांतरण करावे, या मुख्य मागणीसाठी तालुक्यातील ग्रामसेवकांनी संवर्ग विकास अधिकाऱ्यांना सहकार्य न करण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. ३ मे रोजी बुधवारी मासिक सभा आयोजित करण्यात आली होती. या मासिक सभेवर ग्रामसेवकांनी बहिष्कार टाकला.
धानोरा येथील संवर्ग विकास अधिकारी सपाटे हे ग्रामसेवकांना अपमानजनक वागणूक देतात, असा ग्रामसेवकांचा आरोप आहे. त्यामुळे त्यांचे धानोरा येथून स्थानांतरण करावे, या मागणीसाठी १५ दिवसांपूर्वीपासून ग्रामसेवकांनी आंदोलन सुरू केले आहे. मध्यंतरी पंचायत समितीच्या आढावा सभा आ. डॉ. देवराव होळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेवरही ग्रामसेवकांनी सुरुवातीला बहिष्कार टाकला होता. मात्र सपाटे यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आमदारांनी दिल्यानंतर ग्रामसेवक आढावा बैठकीला हजर होते. त्यानंतर मात्र सपाटे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नसल्याने आंदोलन सुरूच ठेवले आहे. ३ मे रोजी केलेल्या आंदोलनात ग्रामसेवक युनियनचे तालुकाध्यक्ष रमेश बोरकुटे, सचिव संजीव बोरकर, कोषाध्यक्ष खुशाल नेवारे, जयंत मेश्राम, नीलकंठ धानोरकर, सुनील संतोषवार, प्रकाश बंडावार, दिवाकर रामटेके, राजेश नागदेवे, भास्कर वडलकोंडा, पांडुरंग बुरांडे, उमेश धोडरे, प्रदीप बेलखेडे, जयश्री कुलसंगे, मडावी, किलनाके यांच्यासह ग्रामसेवक युनियनच्या इतर सदस्यांनी सहभाग नोंदविला होता. (तालुका प्रतिनिधी)