उत्तर गडचिरोली नक्षलमुक्त, पोलिसांचे लक्ष्य आता 'दक्षिण'वर !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 04:55 PM2024-07-19T16:55:03+5:302024-07-19T16:58:26+5:30

साडेतीन वर्षात ८० माओवाद्यांना कंठस्नान: कोरची टिपागड, चातगाव- कसनसूर दलम संपुष्टात

North Gadchiroli Naxal-free, police target now on 'South'! | उत्तर गडचिरोली नक्षलमुक्त, पोलिसांचे लक्ष्य आता 'दक्षिण'वर !

North Gadchiroli Naxal-free, police target now on 'South'!

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
१९८० च्या दशकात छत्तीसगड सीमावर्ती भागातून शिरकाव करणाऱ्या नक्षल्यांमुळे जिल्हा होरपळून निघाला, मात्र, आता नक्षल्यांची पीछेहाट सुरू झाली आहे. १३ मे २०२४ रोजी भामरागड तालुक्यातील कतरंगट्टा जंगलात तीन नक्षली चकमकीत ठार झाले होते, यामुळे पेरमिली दलम संपुष्टात आले होते. आता १७ जुलैला वांढोली (ता. एटापल्ली) जंगलातील चकमकीत १२ नक्षली मृत्युमुखी पडल्याने कोरची टिपागड, चातगाव- कसनसूर दलमचा नायनाट झाला आहे. त्यामुळे उत्तर गडचिरोली नक्षलमुक्त झाले असून आता पोलिसांचे लक्ष्य दक्षिणवर राहणार आहे. वांढोली जंगलातील चकमकीत ठार झालेले नक्षलवादी कोरची टिपागड, चातगाव कसनसूर दलम संबंधित असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात नक्षल्यांचे सध्या केवळ सहा दलम सक्रिय होते, त्यापैकी दोन दलम संपुष्टात आल्याने आता केवळ अहेरी, गट्टा, भामरागड व कंपनी क्र. १० हे चारच दलम शिल्लक राहिले आहेत. 


उत्तर गडचिरोलीतील कोरची, कुरखेडा, धानोरा या तालुक्यांत एकेकाळी नक्षल्यांची मोठी दहशत होती, परंतु ती मोडीत काढण्यात पोलिस यंत्रणेला यश आले आहे. दक्षिण गडचिरोलीचा परिसर छत्तीसगड व तेलंगणा राज्यांच्या सीमेला जोडून आहे. त्यामुळे आता पोलिस यंत्रणा दक्षिणवर आपले लक्ष केंद्रित करणार आहे. साडेतीन वर्षांत ८० माओवाद्यांना सी-६० जवानांनी कंठस्नान घालण्यात यश मिळविले आहे.


चारवेळा चकमकीतून बचावलेला योगेश तुलावी ठार

  • चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये २६ लाख बक्षीस असलेला चातगाव- कसनसूर संयुक्त दलमप्रमुख तसेच विभागीय समिती सदस्य योगेश दावसिंग तुलावी ऊर्फ नरेंद्र ऊर्फ निरींगसाय याचा समावेश आहे. त्याच्यावर हत्या, चकमक, जाळपोळ प्रकरणात एकूण ६७ गुन्हे दाखल होते. पोलिसांत त्याची जहाल नक्षलवादी म्हणून नोंद होती.
  • यापूर्वी चारवेळा तो चकमकीत थोडक्यात वाचला होता. चकमकीनंतर तो जंगलातच दडून बसायचा व नंतर आरामात निघून जायचा. मात्र, १७ जुलैला त्याला नशिबाने साथ दिली नाही. उत्तर गडचिरोलीतील नक्षली चळवळीची सूत्रे तोच फिरवायचा, अखेर चकमकीतच तो पोलिसांच्या गोळीचा निशाणा ठरल्याने नक्षल चळवळीला हा मोठा हादरा आहे.

 

"यापूर्वी मे महिन्यात पेरमिली दलममधील तीन नक्षलवादी चकमकीत ठार झाले होते, त्यामुळे तेथील दलम संपुष्टात आले होते. आता आणखी दोन दलमचा सफाया करण्यात यश आल्याने आता दक्षिण गडचिरोलीत नक्षलविरोधी अभियान गतिमान केले जाणार आहे. नक्षल्यांनी आत्मसमर्पण करून आपले जीवनमान उंचवावे."
- नीलोत्पल, पोलिस अधीक्षक
 

Web Title: North Gadchiroli Naxal-free, police target now on 'South'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.