अंकिसात राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2018 12:46 AM2018-08-12T00:46:56+5:302018-08-12T00:47:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : निजामाबाद ते जगदलपूर हा ८२२ किमीचा ६३ (१६) क्रमांकाचा महामार्ग सिरोंचा तालुक्यातून जातो. अंकिसा येथील मार्ग तसेच येर्रावागू नाल्यावरील पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश चिंता यांनी केला आहे.
अंकिसा गावातून जाणारा एक किमीचा मार्ग बनविण्यासाठी तसचे येर्रावागू नाल्यावरील पूल बांधण्यासाठी जवळपास १६ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर काम पुणे येथील एका कंपनीला दिले आहे. या कंपनीकडून कमिशनवर आसरअल्ली येथील कंपनी व एका लोकप्रतिनिधीच्या अखत्यारित असलेल्या कंपनीला काम देण्यात आले आहे. सदर कंपनी अंकिसा येथील नालीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे करीत आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजुला नागरिकांची घरे आहेत. गरीबांची घरे पाडली जात आहेत. मात्र श्रीमंतांची घरे असलेल्या ठिकाणी महामार्गाची रूंदी कमी करण्यात आली आहे. महामार्गा नागमोडी बनविण्यात येत आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे मार्गाची रूंदी १२ मीटर आहे. मात्र महामार्ग विभागाच्या अभियंत्यांनी मार्गाची रूंदी एक मीटरने कमी केली आहे. काम चालू असताना महामार्ग विभागाचे अधिकारी हजर राहत नाही. सिमेंट व गिट्टीचे प्रमाण किती वापरले जाते. किती सेंटीमीटर काँक्रीट टाकली जात आहे. हे सुध्दा बघितले जात आहे. निकृष्ट दर्जाच्या बांधकामाबाबत महामार्ग विभागाच्या अभियंत्यांकडे अनेकवेळा नागरिकांनी तक्रार केली आहे. मात्र लोकप्रतिनिधीचा वरदस्त असल्याने अधिकारी सुध्दा मानत नाही. रस्ता, नाली बांधकाम व पुलाच्या बांधकामाची चौकशी करावी, अशी मागणी चिंता यांनी केली आहे.