३०० थकबाकीदारांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 01:19 AM2019-03-02T01:19:09+5:302019-03-02T01:19:46+5:30

गडचिरोली नगर परिषदेने अर्थिक वर्ष संपण्याची चाहुल लागताच कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे मागील दोन ते तीन वर्षांपासून कर थकित आहे अशा ३०० थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आली आहे.

Notice to 300 takers | ३०० थकबाकीदारांना नोटीस

३०० थकबाकीदारांना नोटीस

Next
ठळक मुद्देकरवसुली मोहीम वेगात : ९० टक्क्यांवर नेण्याचा गडचिरोली नगर परिषदेचा निर्धार

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेने अर्थिक वर्ष संपण्याची चाहुल लागताच कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. ज्या मालमत्ताधारकांकडे मागील दोन ते तीन वर्षांपासून कर थकित आहे अशा ३०० थकबाकीदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत एकूण ५७.३३ टक्के कर वसुली झाली असून ९० टक्क्यांच्यावर कर वसुली करण्याचा निर्धार नगर परिषद प्रशासनाने केला आहे.
९० टक्क्यांपेक्षा अधिक करवसुली करावी, असे सक्त निर्देशच नगर विकास विभागाने नगर परिषदांना दिले आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त कर वसुली करण्याच्या दृष्टीने नगर पालिका प्रयत्न करीत आहे. गडचिरोली शहरात एकूण ११ हजार ८०५ मालमत्ताधारक आहेत. त्यांच्याकडून एकूण २ कोटी ६४ लाख ८६ हजार ६७० रूपयांची मागणी आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत एकूण १ कोटी ५३ लाख ८२ हजार रूपयांची वसुली झाली आहे. याची टक्केवारी ५८.०८ टक्के एवढी आहे. पाणीपट्टीची एकूण मागणी १ कोटी ८ लाख ८१ हजार ८८९ एवढी आहे. त्यापैकी ५४ लाख ३१ हजार ८८९ रूपयांची वसुली झाली आहे. ५४ लाख ५० हजार रूपये शिल्लक आहेत. पाणीपट्टीची वसुली एकूण मागणीच्या ४९.९२ टक्के एवढी झाली आहे.
सद्यस्थितीत कर वसुलीसाठी एकच पथक नेमण्यात आले आहे. मात्र पुढील आठवड्यात पथकांची संख्या वाढविली जाणार आहे. सध्या केवळ कर विभागाचेच कर्मचारी कर वसुलीचे काम करीत आहेत. इतरही कर्मचाऱ्यांना पथकामध्ये समाविष्ट करून घेतले जाणार आहे. मागील वर्षी मार्चअखेर ८० टक्के करवसुली झाली होती.
थकबाकीदार मालमत्ताधारकांच्या वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे धास्तावलेल्या थकबाकीदारांनी स्वत:हून नगर परिषदेमध्ये येऊन पैसे भरले होते. हीच कार्यपद्धती नगर परिषद यावर्षी अवलंबणार आहे. कर विभाग प्रमुख रवींद्र भंडारवार व कर विभाग सहायक सुनील पुण्यप्रेडिवार यांच्यासह इतर अधिकारी कर वसुलीवर विशेष लक्ष देऊन आहेत.

५ मार्चपासून जप्तीची कारवाई
मालमत्ता धारकांकडे ८४ लाख ५२ हजार ३४४ रूपये, पाणीपट्टीकर २९ लाख ५५ हजार १२३ रूपये, शिक्षण उपकर १२ लाख ५६ हजार ४१५ रूपये, रोहयो उपकर १ लाख २४ हजार ३०३, वृक्षकर १ लाख २४ हजार २३४, गाळेभाडे ४ लाख ९४ हजार ३६८ रूपये थकले आहेत. काही नागरिकांकडे दोन ते तीन वर्षांपासून कर वसुली थकीत आहे. अशा नागरिकांकडून कर वसुली करण्यावर नगर पालिका विशेष भर देत आहे. ३०० मालमत्ताधारकांना नोटीस बजावून कर भरण्याचे आवाहन केले आहे. मात्र काही मालमत्ताधारक जाणूनबूजन कराचा भरणा करीत नाही. अशा करधारकांकडून वसुली करण्यासाठी नगर पालिकेने एक पथक नेमले आहे. हे पथक थकबाकीधारांकडून कराची वसुली करीत आहे.

५ मार्चपासून कर वसुलीची धडक मोहीम सुरू केली जाणार आहे. मालमत्ता कर न भरणाऱ्यांची मालमत्ता जप्त केली जाईल. जप्त केलेली मालमत्ता सोडविण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली जाईल. या मुदतीत मालमत्ता न सोडविल्यास तिचा लिलाव केला जाईल. प्रत्येक नागरिकाने मालमत्ता व इतर कर भरून कारवाई टाळावी. तसेच नगर परिषदेला सहकार्य करावे.
- रवींद्र भंडारवार, कर विभाग प्रमुख, नगर परिषद गडचिरोली

Web Title: Notice to 300 takers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.