३० नोव्हेंबरला विदर्भदिंडी कालेश्वरवरून निघणार
By Admin | Published: October 21, 2016 01:21 AM2016-10-21T01:21:14+5:302016-10-21T01:21:14+5:30
विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने बुधवारी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ दिंडीचे नियोजन करण्यात आले.
वामनराव चटप यांचे नेतृत्व : अहेरी येथे नियोजनाची झाली सभा; जिल्ह्यात जनजागृती करणार
अहेरी : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने बुधवारी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी विदर्भ दिंडीचे नियोजन करण्यात आले. ज्येष्ठ विदर्भवादी नेते माजी आ. वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली अहेरी येथे झालेल्या सभेला माजी मंत्री रमेश गजबे, जिल्हा समन्वयक अरूण पाटील मुनघाटे, जिल्हा सहसमन्वयक रघुनाथ तलांडे, चंद्रशेखर गडसुलवार, रमेश उपलवार, समया पसुला आदी उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना वामनराव चटप म्हणाले की, आजवर विदर्भ राज्याच्या मागणीची गंमतच करण्यात आली. आश्वासनाच्या व्यतिरिक्त वैदर्भिय नेत्यांच्या पदरी काहीही पडले नाही. आगामी काळात विदर्भ राज्याचे आंदोलन अधिक प्रखरपणे राबवून स्वतंत्र विदर्भ राज्य मिळविले जाईल. विदर्भ राज्य दिंडीला सिरोंचा जवळील कालेश्वर येथून ३० नोव्हेंबरला सुरुवात होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी सीमा शिवरकर, ममता उईके, अर्चना निष्ठुरवार, पार्वता मडावी, नागू आत्राम, बुधाजी सिडाम, श्रीनिवास भंडारी, विलास रापर्तीवार आदी उपस्थित होते.
यावेळी दक्षिण गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष म्हणून नागसेन मेश्राम, सचिव म्हणून प्रा. डॉ. पी. एल. ढेंगळे, महिला आघाडी सदस्य म्हणून माजी जि. प. अध्यक्ष आशा पोहणेकर, उपाध्यक्ष यशोधरा गुरनुले यांची निवड करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
स्वतंत्र राज्याशिवाय विकास अशक्य- वामनराव चटप
विदर्भाची मागणी ११३ वर्ष जुनी आहे. विदर्भाचा विकास कुणीही केला नाही. केवळ शोषणच केले आहे. विदर्भाच्या भरवशावर पश्चिम महाराष्ट्र श्रीमंत झाला. ७० टक्के वीज विदर्भात निर्माण होते व तिचा वापर मुंबई, पुण्याचे उद्योजक करतात. विदर्भाचे मागासलेपण दूर करण्यासाठी स्वतंत्र राज्य होणे गरजेचे आहे. याशिवाय विकास शक्य नाही, असे प्रतिपादन माजी आ. अॅड. वामनराव चटप यांनी केले. चामोर्शी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या मेळाव्याला प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री रमेश गजबे, जिल्हा समन्वयक अरूण पाटील मुनघाटे, चंद्रशेखर गडसुलवार, रमेश भुरसे, मंदा तुरे, प्रा. रमेश बारसागडे, देवाजी बुरांडे, वैष्णवी राऊत, कल्पना गजभिये, प्रा. रामचंद्र वासेकर आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. रमेश बारसागडे, अरूण पाटील मुनघाटे, रमेश गजबे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा उपाध्यक्ष पी. जे. सातार, संचालन कृष्णा नैताम, आभार मनमोहन बंडावार यांनी मानले. मेळाव्याला आष्टी, येनापूर, घोट, कुनघाडा येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)