६०० वर गावांत आता मिळणार सुपर फास्ट इंटरनेटची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 04:02 PM2024-10-03T16:02:57+5:302024-10-03T16:04:30+5:30
डीजीटलायझेशनवर भर : केंद्र सरकारच्या योजनेची अंमलबजावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केंद्र व राज्य सरकारच्या वतीने गेल्या चार-पाच वर्षांपासून डिजीटल धोरण अवलंबिले जात असून बहुतांश कामे ऑनलाइन करण्यात आली आहेत. दरम्यान, गावपातळीवरही ऑनलाइन कामे पार पडावी, यासाठी केंद्र सरकारच्या योजनेतून ग्रामपंचायतींना सुपर फास्ट इंटरनेट देण्याची योजना अंमलात आणण्यात आली आहे.
सदर योजनेच्या माध्यमातून प्रशासनाच्या पुढाकाराने बीएसएनएल व इतर कंत्राटदाराच्या सहाय्याने ग्रामपंचायतीमध्ये सुपर फास्ट इंटरनेट बसविण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील सहा तालुक्यातील ६०० पेक्षा अधिक गावात सुपर फास्ट इंटरनेट सुविधा आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये अहेरी, एटापल्ली, मुलचेरा, सिरोंचा, भामरागड, कोरची आदी तालुक्यात सुपर फास्ट इंटरनेटची सुविधा होणार आहे. याचे काम जिल्हा प्रशासनाच्या वतीने सीएससी एजन्सीमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
ऑप्टीकल फायबरने ५५० गावे जोडली
बीएसएनएलच्या माध्यमातून ऑप्टीकल फायबर सेवेतून जिल्ह्याच्या उत्तर भागातील जवळपास ५५० गावे इंटरनेट सुविधेने जोडण्यात आली आहे. या गावांमध्ये आता ऑनलाइन सातबारा, विविध प्रमाणपत्र उपलब्ध होत आहे. ग्रामपंचायतमध्ये कार्यरत ऑपरेटर नागरिकांची ऑनलाइन कामे पूर्ण करीत आहे. गावातच दाखल मिळत असल्याने पायपीट थांबली आहे.
कोरची भागात केव्हा मिळणार इंटरनेट स्पिड
जिल्ह्याच्या उत्तर भागातील कोरची तालुक्यात अजूनही सुपर फास्ट इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही. परिणामी इंटरनेट कनेक्टिव्हीटीची मोठी समस्या या भागात भेडसावते. प्रशासनाने सीएससी एजन्सीच्या माध्यमातून सुविधा करावी.
गावपातळीवरील पाच कार्यालयांना सुविधा
- ग्रामपंचायतीच्या गावात असणाऱ्या पाच कार्यालयांना ग्रा.पं.च्या माध्यमातून इंटरनेट सुविधा देण्याची गरज आहे. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा परिषद शाळा, पोलिस मदत केंद्र, तलाठी कार्यालय व वनपरिक्षेत्र कार्यालयांचा समावेश आहे.
- सदर कार्यालयाचे ऑनलाइन कामकाज थांबू नये, कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी ऑप्टीकल फायबरच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
गतिमुळे दस्तावेज अपलोड
ग्रामपंचायत कार्यालयात फायबर केबलच्या माध्यमातून इंटरनेट सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे. येथे स्पिडने इंटरनेट मिळत असल्यामुळे विविध दाखले तसेच दस्तावेज अपलोड करणे शक्य होते, असे बीएसएनएलच्या सुत्रांनी सांगितले.
४०० ग्रा.पं. मध्ये आहे इंटरनेट
वर्षभरापूर्वी बीएसएनएलच्या माध्यमातून उत्तर भागातील सहा तालुक्यांत ऑप्टीकल फायबर केबलची जोडणी करण्यात आली. या माध्यमातून गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, देसाईगंज, आरमोरी, कुरखेडा या तालुक्यांच्या ४०० ग्रा.पं. मध्ये स्पिडने इंटरनेट सेवा सुरू आहे.