आता खेडेगावातही कॅशलेस व्यवहारांना वाढली पसंती; छोट्या विक्रेत्यांकडेही स्मार्ट पेमेंटची सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2024 02:12 PM2024-11-09T14:12:55+5:302024-11-09T14:14:01+5:30
Gadchiroli : छोट्या विक्रेत्यांकडेही स्मार्ट पेमेंटची सुविधा उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : संपूर्ण देशात डिजिटल पेमेंट इको सिस्टिममुळे आपल्या रोजच्या जगण्यातील व्यवहाराची पद्धत बदलली आहे. शहराप्रमाणेच तालुक्याच्या ग्रामीण भागातील चहा, किराणा दुकान, भाजीपाला, भंगारवाला, चायनीज कॉर्नर, इतर व्यवसाय किंवा मोठ्या शोरूममध्येही 'यूपीआय'द्वारे ऑनलाइन व्यवहार होत असल्याचे दिसून येत आहे.
व्यवहारातील साध्या एक रुपयापासून हजारो रुपयांचे व्यवहार स्मार्ट पेमेंटद्वारे कॅशलेस करत आहेत. त्यामुळे घरात किंवा खिशातदेखील रोख रक्कम ठेवणे नागरिक टाळत असल्याचे दिसून येत आहे. शहरासह ग्रामीण परिसरात सुट्या पैशांचे टेन्शन मिटले आहे. छोट्या विक्रेत्यांकडेही स्मार्ट पेमेंटची सुविधा उपलब्ध झाली आहे. ग्रामीण भागात आधारकार्डवरून बँकेतील पैसे काढून दिले जातात; परंतु घरात मोबाइल सुविधा असल्याने वीज मीटरचे बिल, टेलिफोन बिल, ट्रॅव्हल कंपन्यांचे, विमानाचे, रेल्वेचे तिकीट, सिलिंडरची रक्कमदेखील ऑनलाइन व्यवहारांद्वारे स्वीकारण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर ग्रामीण परिसरातील चहा, किराणा दुकान, भाजीपाला, भंगारवाला, चायनीज कॉर्नर, इतर व्यवसायांसाठी वापर वाढला आहे. परिणामी, सुट्या पैशांचे टेन्शन दूरच झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
ऑनलाइन खरेदी विक्री वाढली असून या व्यवहारातही कॅशलेस व्यवहार केला जात आहे, ऑनलाइनरित्या एखादी वस्तू प्राप्त झाल्यानंतर त्याचे पेमेंट ऑनलाइन अदा केले जात आहे.
काय आहे 'यूपीआय'?
यूपीआय' ही भारतीय पेमेंट सिस्टिम आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन या सरकारी कंपनीने ते विकसित केले आहे. त्याची खास गोष्ट म्हणजे पेमेंट करण्यासाठी ओटीपीची गरज नाही. तुम्ही फक्त पिन टाकून, कोड स्कॅन करून सहज पेमेंट करता येते. त्यामुळे बहुतांश जण 'यूपीआय'चा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.