आता जिल्ह्यातच होणार सैन्यभरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 12:46 AM2018-06-18T00:46:41+5:302018-06-18T00:46:41+5:30
भारतीय सैन्यदलातर्फे वेळोवेळी विविध जिल्ह्यात होणारी सैन्यभरतीची प्रक्रिया गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत होत नव्हती. ही सैन्यभरती प्रक्रिया इतर जिल्ह्यात होत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांवर अर्थिक भुर्दंड बसत होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : भारतीय सैन्यदलातर्फे वेळोवेळी विविध जिल्ह्यात होणारी सैन्यभरतीची प्रक्रिया गडचिरोली जिल्ह्यात आजपर्यंत होत नव्हती. ही सैन्यभरती प्रक्रिया इतर जिल्ह्यात होत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांवर अर्थिक भुर्दंड बसत होता. तसेच प्रवासात बराच वेळ खर्च होत होता. मात्र आता पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात सैन्य पदभरतीची प्रक्रिया घेतली जाणार आहे.
राज्य सरकार तर्फे भारतीय सैन्यदलाला राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात सैन्यभरती घ्यायची याची शिफारस केली जाते. या बाबीची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे यापुढे होणारी सैन्यभरती ही गडचिरोली जिल्ह्यातच घेण्यात यावी अशी मागणी केली होती. याला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावर्षी पासून होणारी सैन्यभरती ही गडचिरोली जिल्ह्यातच घेण्यात येईल, असे मान्य केले आहे.
आजपर्यंत पोलीस भरती याच जिल्ह्यात होत होती परंतु सैन्यभरती ही या जिल्ह्यात होत नसल्याने बेरोजगार युवकांची मोठी आर्थिक कोंडी होत होती याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने यापुढे होणारी सैन्यभरती ही गडचिरोली जिल्ह्यातच घेण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील बेरोजगारारांना सैन्य भरती प्रक्रियेत उतरणे सुलभ होणार आहे. सदर भरती प्रक्रिया गडचिरोली जिल्हास्तरावर होणार असल्याने याचा लाभ अहेरी उपविभागाच्या दुर्गम भागातील युवकांना मिळणार आहे.
पोलीस व सैन्य भरतीवरच युवकांची मदार
गडचिरोली जिल्हा हा उद्योग विरहीत जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात रोजगाराच्या संधी खुप कमी उपलब्ध आहेत. या जिल्ह्यात बेरोजगार युवकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून जिल्ह्यातील युवक पोलीस भरती व सैन्यभरती याकडे मोठ्या आशेने बघतात.