न.प. मुख्याधिकाऱ्यांच्या निष्क्रिय कारभारामुळे शहर विकासाला खीळ
By admin | Published: February 8, 2016 01:32 AM2016-02-08T01:32:53+5:302016-02-08T01:32:53+5:30
नगर पालिकेचे पदाधिकारी व मुख्याधिकारी यांचेवर गडचिरोली शहराच्या विकासाची जबाबदारी आहे.
राजेश कात्रटवार यांचा आरोप : निधी अखर्चित राहण्याची शक्यता
गडचिरोली : नगर पालिकेचे पदाधिकारी व मुख्याधिकारी यांचेवर गडचिरोली शहराच्या विकासाची जबाबदारी आहे. मात्र नगर पालिकेचे मुख्याधिकारी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याने विकासाला खिळ बसली आहे. नगर पालिकेला विविध योजनेंतर्गत कोट्यवधी रूपयांचा निधी प्राप्त झाला. सदर निधी कोणत्या कामावर खर्च करावा, याचे नियोजन करून तसा ठराव दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आला. मात्र मुख्याधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम कारभारामुळे विकास कामे रखडली. त्यामुळे पालिकेचा निधी मोठ्या प्रमाणात अखर्चीत राहण्याची शक्यता आहे. न.प. मुख्याधिकाऱ्यांना प्रशासकीय पाठबळ मिळत आहे, असा आरोप नगर पालिकेचे बांधकाम सभापती प्रा. राजेश कात्रटवार यांनी केला आहे.
सभापती कात्रटवार यांनी म्हटले आहे की, नगरोत्थान योजनेंतर्गत चार तर दलित वस्ती सुधार योजनेतून दोन कोटींचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. या निधीतून शहरातील अनेक वार्डातील विकासकामे पूर्ण होणार आहेत. परंतु निष्क्रीय मुख्याधिकाऱ्यांच्या अकार्यक्षम कारभारामुळे सदर निधी तसाच पडून आहे. आर्थिक वर्ष पूर्ण होण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत निधी खर्च न झाल्यास शहर विकासावर परिणाम होऊ शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पाणी पुरवठ्याची समस्या निर्माण झाली आहे. बारमाही वाहणारी वैनगंगा नदी असूनही दिवसातून एकदाच पाणी पुरवठा करावा लागत आहे. ही समस्या असूनही मुख्याधिकारी पालिका व शहराला वाऱ्यावर सोडून दीर्घ रजेवर गेले आहे, असेही कात्रटवार यांनी म्हटले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
पदाधिकाऱ्यांकडून कामांचे ठराव उशिरा घेण्यात आले. यापैकी काही ठरावावर अंदाजपत्रक तयार करून काही कामांना तांत्रिक व प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. तर काही कामांचे ठराव तांत्रिक मंजुरीसाठी वरिष्ठांकडे पाठविण्यात आले आहेत. पालिकेत कर्मचारी कमी आहेत. कामातील त्रूट्या दूर करून शहरातील कामे लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल.
- गिरीश बन्नोरे, सीओ न.प.गडचिरोली
मुख्यमंत्र्यासमोरही वाचला निष्क्रियतेचा पाढा
नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांचे स्थानांतरण करण्यात यावे, अशी मागणी खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, आ. मितेश भांगडिया यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. त्यानंतर आ. कीर्तीकुमार भांगडिया यांच्या नेतृत्वात नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सीओंच्या निष्क्रियतेचा पाढा वाचला.
अविश्वास ठरावानंतरही कारवाई नाही
न.प. मुख्याधिकाऱ्यांविरूध्द सन २०१५ मध्ये अविश्वास ठराव पारित करण्यात आला. या ठरावाला २३ नगर सेवकांचा पाठींबा आहे. मात्र मुख्याधिकाऱ्यांवर अद्यापही प्रशासकीय कारवाई करण्यात आली नाही.