न.पं. अध्यक्षपदाचे दावेदार निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2018 12:36 AM2018-05-24T00:36:55+5:302018-05-24T00:36:55+5:30
स्थानिक नगर पंचायत अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेकरीता राखीव आहे. येथे या प्रवर्गातील दोनच महिला असल्याने सत्ताधारी व विरोधी गटाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे.
सिराज पठाण ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : स्थानिक नगर पंचायत अध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेकरीता राखीव आहे. येथे या प्रवर्गातील दोनच महिला असल्याने सत्ताधारी व विरोधी गटाचे अध्यक्ष पदाचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. मात्र खरी चूरस उपाध्यक्ष पदाकरीता असून दोन्ही गटाकडून एकापेक्षा अधिक नावे समोर येत असल्याने गटांतर्गत कुरखेडात मोठी चुरस निर्माण झाली आहे.
येथे मागील वेळी शिवसेना काँग्रेस व अपक्षांनी आघाडी तयार करीत अध्यक्ष व उपाध्यक्ष हे दोन्ही पदे बळकावली होती. मात्र यावेळी विरोधी भाजपप्रणित गटाने अपक्ष शाहेदा मुघल यांना आपल्या तंबुत दाखल करीत थेट अध्यक्षपदाचा उमेदवार बनविण्याची तयारी सूरू केली आहे तर सत्ताधारी गटाकडून काँग्रेसच्या आशा तुलावी ह्या एकमेव दावेदार आहेत. येथे लढत अटीतटीची असून बहुमताचा आकडा कुणाकडेही झूकण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन्ही गटाकडून अध्यक्ष पदाचे उमेदवार निश्चित असले तरी उपाध्यक्ष पदाकरीता मोठी चूरस आहे. अध्यक्ष पद महिलेकरिता राखीव असल्याने उपाध्यक्षपदाकरीता दोन्ही गटाकडून पुरूष उमेदवारांनाच संधी मिळण्याची शक्यता आहे.
भाजपकडून गटनेते नागेश फाये, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हुसैनी, कंत्राटदार रवींद्र गोटेफोडे तसेच सहकार नेते प्रकाश पोरेड्डीवार यांचे खंद्ये समर्थक अॅड. उमेश वालदे यांचे नावे चर्चेत आहेत. यात सर्वांचे दावे मजबूत आहे. फाये यांचे कुटुंबीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहे तर हूसैनी यांची अध्यक्ष पदाची संधी मागील वेळी थोडक्यात हूकली होती, त्यामुळे यावेळीही ते दावेदार ठरू शकतात. गोटेफोडे हे सुद्धा अनुभवी राजकारणी आहेत तर अॅड वालदे यांच्यावर पोरेड्डीवार गटाचा शिक्का असला तरी त्यानी पक्षाअंतर्गत अन्य गटाशीही जुळवून घेतले असल्याने त्यांचा ही दावा नाकारता येत नाही. मात्र भाजपात शिस्तीला महत्व असल्याने पक्ष आदेश देईल, तोच उमेदवार ठरेल अशी चर्चा आहे.
सत्ताधारी गटाकडून अध्यक्ष पदाची उमेदवारी काँग्रेसला देण्यात येणार असल्याने उपाध्यक्ष पदावर शिवसेनेचा दावा राहणार आहे येथे विद्यमान पाणी पुरवठा सभापती पुंडलिक देशमुख, बांधकाम सभापती संतोष भट्टड हे दावेदार असले तरी शिवसेना जिल्हा प्रमुखांचा शब्द अंतिम राहणार आहे. एकमत न झाल्यास विद्यमान नगराध्यक्ष डॉ. महेंद्रकुमार मोहबंसी हे सुद्धा उपाध्यक्ष पदाचे उमेदवार होऊ शकतात. कुरखेडात अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत चुरस आहे.