नरेगाचे कंत्राटी कर्मचारी आक्रमक
By admin | Published: May 19, 2017 12:18 AM2017-05-19T00:18:23+5:302017-05-19T00:18:23+5:30
बाह्यस्थ पध्दतीने खासगी संस्थेकडून रोजगार हमी योजनेच्या कामात कंत्राटी मनुष्यबळ पुरविण्याच्या निविदा प्रक्रियेचा विरोध करून
जिल्हा कचेरीसमोर धरणे : बाह्यस्थ खासगी संस्थेकडून कर्मचारी निवडीस विरोध
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बाह्यस्थ पध्दतीने खासगी संस्थेकडून रोजगार हमी योजनेच्या कामात कंत्राटी मनुष्यबळ पुरविण्याच्या निविदा प्रक्रियेचा विरोध करून आपल्या अधिकार व हक्कासाठी नरेगाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी गडचिरोली जिल्हा मुख्यालयी एल्गार पुकारला. १०० वर कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिली.
जिल्हा सेतू समितीमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्ती संदर्भात देण्यात येणारे आदेश पूर्वीप्रमाणेच सेतू समितीमार्फत देण्याची पध्दत सुरू ठेवावी, नरेगा अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियुक्तीचे संरक्षण देऊन मिळत असलेले एकत्रित मानधन कायम ठेवण्यात यावे, जाहिरातीमध्ये दिलेली निविदा रद्द करून पूर्वीप्रमाणे जिल्हा सेतू समितीमार्फत नरेगाच्या सर्व कंत्राटी कर्मचऱ्यांना नियुक्ती आदेश देण्यात यावे, कार्यरत कर्मचऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन पुनर्नियुक्ती आदेश द्यावे, जुलै २०१६ ते आजपर्यंतचे आठ टक्के वाढीचे रोखीव वेतन तत्काळ काढण्यात यावे आदी मागण्यांसाठी बाराही पंचायत समितीस्तरावरील नरेगाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन केले.
दरम्यान जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्याशी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी चर्चा केली. मात्र कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे १९ मे शनिवारपासून बेमुदत साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा प्रशासनास दिला आहे. या आंदोलनात भास्कर राऊत, संजय खोबे, पंकज खरवडे, गोविंद पुनमवार, विजय भेडके, शैलेश लाड, मोहन बोदेले, विनोद नाकतोडे, ऋषी निकोडे, अविनाश खेवले, राजेंद्र भानारकर, अष्टशील कांबळे, मनोज पडीशालवार आदीसह कंत्राटी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.