एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी दिले धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 12:13 AM2018-05-09T00:13:43+5:302018-05-09T00:13:43+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शिक्षणाच्या व अनुभवाच्या आधारे नियमित शासन सेवेत समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवार पासून कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांचे शिक्षणाच्या व अनुभवाच्या आधारे नियमित शासन सेवेत समायोजन करण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवार पासून कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जिल्हा परिषदेसमोर मंगळवारी जिल्ह्यातील सर्व ८६२ कर्मचाºयांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांत संपूर्ण राज्यात १८ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. मागील १२ वर्षांपासून सदर कंत्राटी कर्मचारी, अधिकारी शासन सेवेत नियमित पदावर समायोजन करण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करीत आहेत. मात्र शासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यामुळे ११ एप्रिलपासून कामबंद आंदोलन करण्यात आले होते. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यात कार्यरत कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. त्यानंतर २१ एप्रिल रोजी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी चर्चा केली. यावेळी मागण्यांसंदर्भात कार्यवाही करण्यासाठी शासनाला १० दिवसांचा अवधी देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले होते. शासनाने दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही. तसेच दिलेला १० दिवसांचा अवधी ७ मे रोजी संपुष्टात आला. यामुळे राज्य संघटनेच्या वतीने आणखी तिव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मंगळवार पासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. १४ मे पासून नाशिक ते मुंबई दरम्यान लॉंगमार्च तसेच २४ मे पासून मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. जि.प. समोर झालेल्या या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष बांबोळे, सचिव कोटगले, कोषाध्यक्ष मेश्राम, महेशगौरी, निमगडे, अलोणे, डॉ. मेश्राम, रघुवंशी, फुलझेले, महाले, जनबंधु, जोगदंडे, चौधरी, मेश्राम, लाकुडवाहे, गोविंदा, बारसिंगे यांच्यासह कर्मचारी हजर होते.