लोहखाणीत वाढताहे काम मागणाऱ्यांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2021 05:00 AM2021-10-15T05:00:00+5:302021-10-15T05:00:37+5:30
सुरक्षा गार्ड, पहाडीवरील काम, कंपनीकडून सुरू असलेले एटापल्ली-आलापल्ली रस्त्याचे काम, जीवनगट्टा येथील बेस कॅम्पचे काम, हेडरी व एटापल्ली येथील दवाखाना, एटापल्ली येथील ऑक्सिजन प्लांट यासह इतर ठिकाणी महिला, पुरुष, सुशिक्षित बेरोजगार युवकांना काम मिळाले आहे. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या प्रकल्पाला ग्रामसभेचा विरोध असला तरी प्रकल्पात काम मिळण्यासाठी सामान्य नागरिक आणि बेरोजगार युवा वर्गाची धडपड सुरू आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून काम मिळेल आणि आपल्याही घरात चार पैसे येतील, या आशा लावून ते बसले आहेत.
लाेकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : तालुक्यातील सुरजागड पहाडीवरील लोहखनिज प्रकल्पाचे काम नव्या जोमाने सुरू झाले आहे. दररोज दोन हजारांवर मजूर या कामावर हजेरी लावत आहेत. त्यांना पाहून परिसरातील अनेक गावांतील लोकही काम मागण्यासाठी सरसावत आहेत. यात सुशिक्षित बेरोजगारांसह अल्पशिक्षित किंवा अशिक्षितांचेही प्रमाण मोठे आहे.
दररोज शेकडो बेरोजगार युवक सुरजागड पहाडीवर जाऊन अर्ज करत कामाची मागणी करीत आहेत. सद्य:स्थितीत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दोन हजारांवर लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
यात सुरक्षा गार्ड, पहाडीवरील काम, कंपनीकडून सुरू असलेले एटापल्ली-आलापल्ली रस्त्याचे काम, जीवनगट्टा येथील बेस कॅम्पचे काम, हेडरी व एटापल्ली येथील दवाखाना, एटापल्ली येथील ऑक्सिजन प्लांट यासह इतर ठिकाणी महिला, पुरुष, सुशिक्षित बेरोजगार युवकांना काम मिळाले आहे.
सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देणाऱ्या प्रकल्पाला ग्रामसभेचा विरोध असला तरी प्रकल्पात काम मिळण्यासाठी सामान्य नागरिक आणि बेरोजगार युवा वर्गाची धडपड सुरू आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून काम मिळेल आणि आपल्याही घरात चार पैसे येतील, या आशा लावून ते बसले आहेत. विशेष म्हणजे ज्या खराब रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नागरिकांनी आंदोलन केले होते त्या रस्त्याचे काम अखेरपर्यंत कंत्राटदाराने सुरूच केले नाही. त्यामुळे हे काम आता सुरजागड पहाडीवर काम करणाऱ्या त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीने हाती घेतले आहे. आलापल्ली ते चोखेवाडापर्यंतच्या रस्त्याला मंजुरी मिळाली आहे.
आरोग्यविषयक सोयी-सुविधांची भर
लॉयड्स मेटल्सने लोहखनिज काढण्याचे काम ज्या कंपनीला दिले त्या त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनीने एटापल्ली आणि हेडरी येथे रुग्णालय सुरू केले आहे. त्या ठिकाणी मोफत औषधोपचार दिले जात आहे. त्यामुळे उपचारासाठी येणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. याशिवाय एटापल्ली ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात या कंपनीने ऑक्सिजन प्लांट तयार केला आहे. आपत्कालीन स्थितीत गरज पडेल त्याला किंवा कोरोनासारख्या महामारीची लाट आल्यास या आरोग्य सुविधेतून मोठा दिलासा मिळणार आहे.
भविष्य निर्वाह निधीचा विचार करा
दरम्यान सुरजागड पहाडावरील कामगारांना दिवसानुसार आणि हप्त्यानुसार कामाचा मोबदला न देता महिन्याकाठी पगार द्यावा, तसेच त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचाही विचार करावा, जेणेकरून कामावरील युवकांची बचत होऊन कुटुंबीयांसाठी भविष्यातील नियोजन करणे सोपे जाईल, अशी मागणी आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी केली आहे. आज २ हजार युवक काम करत आहेत; पण ही संख्या वाढण्यासाठी कोनसरीचा प्रकल्प लवकर सुरू करून युवा वर्गाची रोजगाराची समस्या कंपनीने दूर करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.