काेराेना काळात क्षयराेगाचे रुग्ण घटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:42 AM2021-08-14T04:42:08+5:302021-08-14T04:42:08+5:30
काेराेनाच्या पूर्वी वर्षभरात साधारणत: १ हजार ८०० रुग्णांचे निदान हाेऊन त्यांच्यावर उपचार हाेत हाेते. आराेग्य विभागाने या राेगाबाबत जनजागृती ...
काेराेनाच्या पूर्वी वर्षभरात साधारणत: १ हजार ८०० रुग्णांचे निदान हाेऊन त्यांच्यावर उपचार हाेत हाेते. आराेग्य विभागाने या राेगाबाबत जनजागृती केल्याने ग्रामीण भागातील नागरिकही या राेगाची लक्षणे दिसून आल्यानंतर उपचारासाठी उपकेंद्रातील परिचारिका, आशा वर्कर यांना कळवतात. जिल्ह्यातील सर्वच उपकेंद्रे, प्राथमिक आराेग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये यामध्ये उपचाराच्या सुविधा आहेत. तसेच एखाद्या खासगी डाॅक्टरकडे क्षयराेगाची लक्षणे असलेला रुग्ण गेल्यास त्याची तपासणी करून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवितात.
क्षयराेग हा पूर्णपणे बरा हाेणारा राेग आहे. मात्र त्याचे निदान व उपचार वेळीच हाेणे आवश्यक आहे. काेराेना व क्षयराेगाची लक्षणे जवळपास सारखीच आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी गेल्यास काेराेनाची चाचणी केली जाते, अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याने काही रुग्ण तपासणी करून घेण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांच्या कालावधीत जिल्हाभरात ७५० क्षयराेगाचे रुग्ण आढळून आले आहेत. वर्षभरात हा आकडा जास्तीत जास्त १ हजार ५०० पर्यंत पाेहाेचू शकताे. काेराेनापूर्वीच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे.
बाॅक्स ......
कशामुळे हाेतो क्षयराेग?
क्षयराेग हा मायक्राेबॅक्टेरिया या प्रकारच्या जिवाणूमुळे हाेतो. यामुळे फुफ्फुसाला बाधा निर्माण हाेते. क्षयराेग हा संसर्गजन्य राेग आहे. एक व्यक्ती दहा ते पंधरा व्यक्तींना संसर्ग करू शकते. क्षयराेगबाधित व्यक्ती बाेलला, थुंकला किंवा शिंकला तरी त्याच्या शरीरातील क्षयाचे जंतू बाहेर पडतात. हवेद्वारे ते जवळ असलेल्या निराेगी व्यक्तींच्या शरीरात प्रवेश करतात. संसर्ग झालेल्या व्यक्तीची राेगप्रतिकारक क्षमता कमी असल्यास त्याला या राेगाची बाधा हाेते.
बाॅक्स .
काय आहेत लक्षणे...
एखाद्या व्यक्तीला सतत दाेन आठवड्यांपेक्षा जास्त काळ खाेकला असणे, वजन कमी हाेणे, भूक मंदावणे, हलकासा परंतु सायंकाळी ताप येणे, छातीत दुखणे, रात्री घाम येणे आदी लक्षणे दिसून येतात.
बाॅक्स ...
वेळीच उपचार झाल्यास जिवाला धाेका नाही
क्षयराेगावर सरकारी रुग्णालयांमध्ये अतिशय प्रभावी औषधाेपचार माेफत स्वरूपात उपलब्ध आहेत. क्षयराेगाचे वेळीच निदान हाेऊन उपचार झाल्यास हा राेग पूर्णपणे बरा हाेतो. यासाठी सहा महिने औषध दिले जाते. सहा महिन्यांमध्ये हा राेग पूर्णपणे बरा हाेतो. मात्र रुग्णाची राेगप्रतिकारक क्षमता अतिशय कमी असल्यास, त्याला एखादा जुना गंभीर राेग असल्यास किंवा क्षयराेगाचे निदान हाेण्यास उशीर झाल्यास जिवाला धाेका हाेऊ शकतो.
बाॅक्स .......
५०० रुपये आहार भत्ता मिळतो
क्षयराेगाने बाधित असलेल्या व्यक्तीची राेगप्रतिकारक क्षमता वाढावी यासाठी शासनाकडून प्रति महिना ५०० रुपये आहार भत्ता दिला जातो. तेवढी रक्कम संबंधित रुग्णाच्या खात्यावर जमा केली जाते. ही रक्कम साधारणत: सहा महिन्यांपर्यंत दिली जाते.
काेट ......
शासकीय रुग्णालयांमध्ये क्षयराेगावर अत्यंत प्रभावी उपचार उपलब्ध आहेत. मात्र या राेगाचे निदान हाेण्यास विलंब हाेता कामा नये. १९ जुलै ते ३१ ऑक्टाेबर या कालावधीत सक्रिय रुग्ण शाेधमाेहीम व नियमित संनियंत्रण उपक्रम जिल्ह्यात राबविला जात आहे. आशा वर्कर्स घराेघरी जाऊन भेट देऊन विचारणा करणार आहेत. क्षयराेगाची लक्षणे दिसून आलेल्या व्यक्तीने तपासणी करून घ्यावी.
- डाॅ. सचिन हेमके, जिल्हा क्षयराेग अधिकारी, गडचिराेली