कोरानाबाधितांची संख्या पोहोचली आठवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:00 AM2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:00:39+5:30
सदर पॉझिटिव्ह रुग्णांसोबत विलगिकरण कक्षात असणाऱ्या लोकांनाही कोरोनाची बाधा झाली असण्याची शक्यता पाहता तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे जिल्हा अध्यक्ष म्हणून दीपक सिंगला यांनी बुधवारी पुन्हा काही प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये वाढ केली आहे. त्यात आरमोरी तालुक्यातील संपूर्ण शंकरनगर गाव, चामोर्शी तालुक्यातील मौजा श्यामनगर, आणि संपूर्ण घोट गावाचा समावेश आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यापासून आता दररोज बाधित रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येत आहेत. बुधवारी त्यात २ लोकांची भर पडल्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रु ग्णांची संख्या आता ८ वर पोहोचली आहे. हे नवीन रुग्णही आधीच्या रुग्णांसोबतच मुंबईवरून परतलेले आहेत. त्यापैकी एक कुरखेडा तर दुसरा चामोर्शी येथील संस्थात्मक विलगिकरण कक्षात होता.
सदर पॉझिटिव्ह रुग्णांसोबत विलगिकरण कक्षात असणाऱ्या लोकांनाही कोरोनाची बाधा झाली असण्याची शक्यता पाहता तो परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे जिल्हा अध्यक्ष म्हणून दीपक सिंगला यांनी बुधवारी पुन्हा काही प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये वाढ केली आहे. त्यात आरमोरी तालुक्यातील संपूर्ण शंकरनगर गाव, चामोर्शी तालुक्यातील मौजा श्यामनगर, आणि संपूर्ण घोट गावाचा समावेश आहे. संबंधित तहसीलदार हे त्या भागाचे नियंत्रक अधिकारी असतील.
प्रतिबंधित क्षेत्रामध्ये जिल्हाधिकाऱ्यांने आदेशान्वये दिलेली विविध बाबींची सूट लागू राहणार नाही. त्यात प्रामुख्याने प्रवास, दुकाने, सेवा इत्यादी बाबी पूर्णत: प्रतिबंधित असतील. सदर भागात केवळ वैद्यकीय सेवेशी संबंधित अधिकृत अधिकारी/कर्मचारी यांनाच प्रवेश राहील. तसेच अन्नधान्य/भोजन/विलगीकरण कक्षाशी संबंधित संसाधने यांच्याशी संबंधित व्यक्तींनाच तहसीलदारांच्या पूर्वपरवानगीने अनुमती राहील. या आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह हे साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र राहतील.
सध्या जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या विलगीकरण कक्षामध्ये बाहेरून आलेल्या लोकांना ठेवण्यात आले आहे. संशयित रु ग्णांची वैद्यकीय तपासणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
सिरोंचा, एटापल्ली तालुक्यातही इमारती अधिग्रहीत
संशयबाधित लोकांच्या विलगीकरणासाठी राखीव कक्ष म्हणून सिरोंचा, एटापल्ली व चामोर्शी तालुक्यातील इमारती अधिग्रहीत करण्यात आल्या. त्यात सिरोंचा तालुक्यातील मुलींचे वसतिगृह, सिरोंचा मॉडेल इंग्लिश स्कूल, शासकीय अनु.जाती (नवबौद्ध) मुलींची शाळा सिरोंचा, श्रीनिवासन हायस्कूल अंकिसा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय सिरोंचा, शासकीय आश्रमशाळा बामणी, शासकीय आश्रमशाळा सिरोंचा, भगवंतराव आश्रमशाळा आसरअल्ली, एटापल्ली तालुक्यातील आदिवासी मुलींचे वसतिगृह एटापल्ली, आदिवासी मुलांचे वसतिगृह एटापल्ली, औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसतिगृह एटापल्ली, तसेच चामोर्शी तालुक्यातील शिवाजी महाविद्यालय चामोर्शी, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी, एस.चंद्रा महिला महाविद्यालय आष्टी आदी इमारती अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले.
एटापल्ली येथे कोरोना नियंत्रण कक्ष
एटापल्ली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तहसील कार्यालय, एटापल्ली येथे कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापन करण्यात आली आहे. त्याचा संपर्क क्र मांक ९४०३०७०१९२ असा आहे. कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाकरिता आवश्यक माहिती/तक्रार सादर करण्यासाठी नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच परजिल्ह्यातून व परराज्यातून सक्षम अधिकाऱ्याच्या पूर्वपरवानगीने किंवा विनापरवानगीने एटापल्ली तालुक्यात आलेल्या व्यक्तींची माहितीसुद्धा नागरिकांनी या क्र मांकावर संपर्क करु न सादर करावी, असे तहसीलदार तथा अध्यक्ष, तालुकास्तरीय कोरोना सनियंत्रण समिती एटापल्ली यांनी कळविले आहे.