बालकांच्या आरोग्यासाठी पोषणयुक्त तांदूळ फायदेशीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2018 11:33 PM2018-11-15T23:33:42+5:302018-11-15T23:37:01+5:30
देशात नियमित होत असलेल्या सर्व्हेक्षण अहवालाच्या आधारे कुपोषणाचे कारण लक्षात आले. विशेष करून ज्या भागात भाताचे विपुल प्रमाणात उत्पादन होते, त्याच भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे देशात पोषणतत्व गुण संवर्धीत (फोर्टिफाईड) तांदूळ प्रकल्प सुरू करण्याच्या पूर्वी प्रायोगिक तत्वावर आरमोरी येथे सदर प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : देशात नियमित होत असलेल्या सर्व्हेक्षण अहवालाच्या आधारे कुपोषणाचे कारण लक्षात आले. विशेष करून ज्या भागात भाताचे विपुल प्रमाणात उत्पादन होते, त्याच भागात कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे देशात पोषणतत्व गुण संवर्धीत (फोर्टिफाईड) तांदूळ प्रकल्प सुरू करण्याच्या पूर्वी प्रायोगिक तत्वावर आरमोरी येथे सदर प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात येत आहे. आदिवासी भागातील कुपोषण निर्मूलनासाठी तसेच बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी हा पोषणयुक्त आहार फायदेशीर ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण तथा अन्न औषध प्रशासन मंत्री गिरीष बापट यांनी केले.
अन्न-नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तसेच टाटा ट्रस्ट मुंबईच्या सहकार्याने फोर्टिफाईड तांदूळ प्रकल्पाचा शुभारंभ गुरूवारी येथील जेना अॅग्रो राईस मिलमध्ये करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास, वने राज्यमंत्री तथा पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम तर प्रमुख अतिथी म्हणून जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, आमदार कृष्णा गजबे, प्रधान सचिव महेश पाठक, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प.चे मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी संपत खलाटे, राईस मिलचे संचालक हैदरभाई पंजवानी, टाटा ट्रस्टच्या सोनल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना.बापट म्हणाले, आदिवासी भागातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी फोर्टिफाईड तांदूळ वितरणाचा महत्त्वाकांक्षी उपक्रम गडचिरोली जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानांमार्फत सुरू होत आहे. प्रशासकीय यंत्रणेने गरजू लोकांपर्यंत धान्य व्यवस्थित पोहोचेल, याची दक्षता घ्यावी, अशी सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी प्रास्ताविकातून फोर्टिफाईड तांदूळ वितरण उपक्रमाची सविस्तर माहिती दिली. सन २०१५-१६ च्या चौथ्या राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणानुसार, महाराष्ट्रातील सहा महिने ते पाच वर्ष या वयोगटातील ५३.०८ टक्के मुलांमध्ये तसेच १५ ते ४९ वर्ष वयाच्या महिलांमध्ये ४८ टक्के तर गर्भवती महिलांमध्ये ४७.०९ टक्के इतक्या प्रमाणात अॅनिमिया झाल्याचे दिसून आले आहे. त्यांच्यात पोषणद्रव्ये वाढविण्यासाठी फोर्टिफाईड तांदूळ पुरविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
याप्रसंगी जि.प. अध्यक्ष योगीता भांडेकर, आमदार कृष्णा गजबे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. नरेंद्र आरेकर यांनी तर आभार जिल्हा पुरवठा अधिकारी संपत खलाटे यांनी मानले.
ओबीसींच्या शिष्टमंडळाला अपमानजनक वागणूक
जिल्ह्यातील ओबीसींचे १९ टक्क्यांवरून ६ टक्के झालेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करून झालेला अन्याय दूर करण्याची मागणी करण्यासाठी ओबीसींचे शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी गेले. यावेळी एका ज्येष्ठ नेत्याने या शिष्टमंडळाला अपमानजनक वागणूक देऊन बाहेर जाण्यास सांगितले. या प्रकाराचा तिथेच निषेध करण्यात आला. यावेळी मिलींद खोब्रागडे, अतुल आकरे, दिलीप घोडाम, कुमेश धुपाजारे, साबीर शेख, सारंग जांभुळे, नितेश मेश्राम, नरेश गजभिये, सचिन हेमके इतर काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
लोहयुक्त मिठाचेही वितरण होणार
जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या या प्रायोगिक तत्वावरील उपक्रमास टाटा ट्रस्टची मदत प्राप्त झाली आहे. फोर्टिफाईड तांदळासोबतच लोहयुक्त मिठाचे वितरण सुध्दा स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, असे यावेळी ना. बापट यांनी सांगितले.