पोषण आहार कर्मचाऱ्यांची खासदारांच्या कार्यालयावर धडक
By admin | Published: May 18, 2016 01:33 AM2016-05-18T01:33:20+5:302016-05-18T01:33:20+5:30
केंद्र शासनाच्या केंद्रीय स्वंयपाकगृह प्रणाली (सेन्ट्रल किचन) मार्फत विद्यार्थ्यांना पोषण आहार देणार असल्याने कार्यरत पोषण आहार कर्मचारी
आक्रोश मोर्चा : केंद्र सरकारच्या सेंट्रल किचन योजनेचा केला विरोध; सेवेत कायम करा
गडचिरोली : केंद्र शासनाच्या केंद्रीय स्वंयपाकगृह प्रणाली (सेन्ट्रल किचन) मार्फत विद्यार्थ्यांना पोषण आहार देणार असल्याने कार्यरत पोषण आहार कर्मचारी व महिला बचत गटांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यामुळे शासनाच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मंगळवारी रखरखत्या उन्हात शेकडो पोषण आहार कर्मचाऱ्यांनी आयटकच्या नेतृत्वात केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात घोषणा देऊन आमदार, खासदार यांच्या कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.
या मोर्चाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष विनोद झोडगे, आयटकचे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, राज्य कौन्सिल सदस्य वनिता कुंठावार, श्रीधर वाढई, भाकपचे जिल्हा सचिव डॉ. महेश कोपुलवार, श्रीधर वाढई, अॅड. जगदिश मेश्राम, कुंदा कोहपरे, मोरेश्वर डांगे, संध्या वासेकर, शंभू निकुरे, कल्पना रायपुरे, कुंदा चलीलवार, सारीका वांढरे, रूपाली हेडाऊ, गणेश चापले आदींनी केले. मोर्चेकरांच्या वतीने खासदार अशोक नेते यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात सेवेत कायम करण्यात यावे, वेतन श्रेणी, मानधन, कामावरून कमी करणाऱ्या शाळा व्यवस्थापन समिती व मुख्याध्यापकांवर कारवाई करावी, अतिरिक्त कामे देणे बंद करावे, गॅस सिलिंडरचा पुरवठा करावा, करारनाम्यानुसार गणवेश वर्षातून दोनवेळा देण्यात यावे, कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना १२ महिन्याचे मानधन व वयाच्या ६० वर्षानंतर पाच हजार रूपये पेन्शनचा कायदा करावा आदी मागण्यांचा समावेश आहे. खासदार अशोक नेते यांनी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे निवेदन स्वीकारून शासनस्तरावर योग्य पाठपुरावा करू, असे आश्वासन या पाकर्मचाऱ्यांना दिले. (नगर प्रतिनिधी)