पीक कर्जाचे २२० कोटींचे उद्दिष्ट

By Admin | Published: May 4, 2017 01:29 AM2017-05-04T01:29:15+5:302017-05-04T01:29:15+5:30

जिल्हाभरातील बँकांना २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे २२० कोटी रूपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

Objective of 220 crores of crop loan | पीक कर्जाचे २२० कोटींचे उद्दिष्ट

पीक कर्जाचे २२० कोटींचे उद्दिष्ट

googlenewsNext

२०१७-१८ या वर्षातील खरीप व रब्बी हंगाम
गडचिरोली : जिल्हाभरातील बँकांना २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे २२० कोटी रूपयांच्या पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. खरीपासाठी १९४.६२ कोटी व रब्बीसाठी २५.३८ कोटी रूपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे.
शेतकरीवर्ग आधुनिक पद्धतीने शेती करीत असल्याने शेतीचा खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कर्जासाठी शेतकरी सावकाराच्या दारी उभा होऊ नये, यासाठी राष्ट्रीयकृत बँका, ग्रामीण बँका व सहकारी बँकांना दरवर्षी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले जाते. बँकांच्या मार्फतीने दिले जाणारे कर्ज सावकार व बचतगटाच्या तुलनेत स्वस्त राहत असल्याने शेतकरी सुद्धा पीक कर्ज घेत आहे.
पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकतीच खरीप आढावा बैठक पार पडली. या बैठकीत खरीपासंदर्भातील कामांचा व योजनांचा आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील सर्वच बँकांना सुमारे २२० कोटी रूपयांच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मागील वर्षीपर्यंत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार होत नव्हता. मात्र ज्या बँका कर्ज देणार नाही, अशा बँकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश मागील वर्षी शासनाने दिले होते. त्यानंतर बँकांनी गावागावात मेळावे घेऊन पीक कर्जाविषयी जागृती केली. पीक कर्जासाठी लागणारी कागदपत्रे याविषयीची माहिती दिली. आता शेतकऱ्यांमध्ये पीक कर्जाविषयीची जागृती आली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग स्वत:हून पीक कर्ज घेण्यासाठी पुढे येत आहे. दरवर्षी कर्ज घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. पूर्वी रब्बी पिकासाठी शेतकरी कर्ज घेत नव्हते. आता मात्र रब्बी पिकासाठीही कर्ज घेत आहेत. खरीप पिकामध्ये सूर्यफूल, उन्हाळी तूर, सोयाबीन, मूग, उडीद आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते.
खरीप हंगामात प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्यात धानाचे उत्पादन घेतले जाते. धानाच्या लागवडीपासून ते काढणीपर्यंत विविध बाबींवर शेतकऱ्याला खर्च करावा लागतो. धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात असल्याने खरीप हंगामासाठी सर्वाधिक पीक कर्जाची मागणी होते. त्यामुळे खरीपासाठी उद्दिष्टही अधिकचे ठरविण्यात आले आहे. २०१७-१८ च्या हंगामात शेतकऱ्यांना १९४.६२ कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट बँकांना दिले आहे. उद्दिष्ट जरी दिले असले तरी राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र बघायला मिळते. काही बँका केवळ कारवाई वाचविण्यासाठी निवडकच शेतकऱ्यांना कर्ज देत असल्याचेही समोर आले आहे. (नगर प्रतिनिधी)

शून्य टक्के व्याज दराने कर्ज वाटप
मागील १० वर्षांपासून शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज वाटप केले जात आहे. जवळपास एप्रिल ते ३१ मार्चपर्यंत कर्जाचे पैसे वापरता येतात. त्यामुळे शेतकरी वर्ग बँकेच्या मार्फतीने कर्जाची उचल करण्याकडे विशेष भर देत असल्याचे दिसून येत आहे.
दुर्गम भागातील शेतकरी कर्जाचे ओझे नको, म्हणून कर्ज घेण्यास तयार होत नाही. धानाचे पीक झाले नाही तर कर्ज भरण्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे काही शेतकरी मात्र कर्ज घेण्यास तयार होत नाही.
 

Web Title: Objective of 220 crores of crop loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.