संस्कार केंद्राची अवदशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 12:09 AM2018-01-14T00:09:04+5:302018-01-14T00:09:48+5:30
चांगले संस्कार करून अनेकांचे आयुष्य घडविणाऱ्या सिरोंचा येथील संस्कार केंद्राकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. देखभालीअभावी इमारत कोसळण्याच्या मार्गावर असली तरी या इमारतीवर टांगलेला दारूबंदी संस्कार केंद्र नावाचा बोर्ड जुन्या आठवणींना उजाडा देत आहे.
आनंद मांडवे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : चांगले संस्कार करून अनेकांचे आयुष्य घडविणाऱ्या सिरोंचा येथील संस्कार केंद्राकडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. देखभालीअभावी इमारत कोसळण्याच्या मार्गावर असली तरी या इमारतीवर टांगलेला दारूबंदी संस्कार केंद्र नावाचा बोर्ड जुन्या आठवणींना उजाडा देत आहे.
६० च्या दशकात सय्यद सत्तारचाचा यांच्या मालकीच्या दोन खोल्यांमध्ये संस्कार केंद्र सुरू करण्यात आले होते. या संस्कार केंद्रामध्ये शासनाने स्वतंत्र कर्मचारी नेमला होता. संस्कार केंद्रातील संपूर्ण खर्च शासनाकडून उचलला जात होता. त्यामुळे सिरोंचासह परिसरातील अनेक नागरिक या ठिकाणी येत होते. दिवस-रात्रभर या ठिकाणी विविध कार्यक्रमांची रेलचेल राहत होती. या संस्कार केंद्राने अनेकांचे आयुष्य घडविले आहे. काही कालावधीनंतर तहसील कार्यालयाच्या परिसरातील ब्रिटीशकालीन आॅफिसर्स क्लबमध्ये संस्कार केंद्र सुरू करण्यात आले. त्यालगतच्या पटांगणात सिंगल बार, डब्बल बार हे व्यायाम प्रकार दिसत होते. व्हॉलिबॉल, बॅडमिंटन, कबड्डी यासारखे मैदानी सामने सुद्धा रंगत होते. बुद्धीबळाचे डाव इमारतीच्या वºहांड्यात जमू लागले. बुद्धीबळाची जागा काही दिवसांनी रमीने घेतली. त्यामुळे राजा, वजीर, हत्ती, उंट, घोडा यांची जागा किंग, राणी, गुलाम, एक्का, नहला, दहला यांनी घेतली. रमी खेळतानाही रम कधी आली हे कळलेच नाही. रम, रमीचे डाव रंगत असताना तहसील कार्यालयाच्या परिसरातील संस्कार केंद्र मालगुजारी बंगल्याजवळ स्थानांतरित झाले. मात्र काही दिवसातच शासनाने दिलेला कर्मचारी काढून घेतला. संस्कार केंद्रासाठी मिळणारा निधी बंद केला. तेव्हापासून संस्कार केंद्राची अवदशा सुरू झाली.
सदैव शुभ्र वस्त्रे परिधान करून संपूर्ण गावाला आदर्शाचे धडे देणाºया शांताराम बापूंच्या पिंजरातील उत्तरार्धातल्या श्रीधरपंत गुरूजींसारखी त्याची अवस्था झाली. खप्पड चेहऱ्यावर वाढलेल्या दाढीप्रमाणे आता संस्कार केंद्रावर झाडी उगवल्या आहेत. पांढºया फटक भिंती बेवड्यांच्या लक्तरांसारख्या मळकट झाल्या आहेत. बेवारस कुत्रे, मांजर, उंदीर, घुशींचे आश्रयस्थान बनले आहे. वºहांड्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. युवा मंडळींनी विरंगुळ्यासाठी आता कालेश्वराची वाट धरली आहे. त्यामुळे या संस्कार केंद्राकडे दुर्लक्ष झाले आहे.
आयुष्य घडलेल्यांचे डोळे पाणावतात
संस्कार केंद्रातून शिस्तीचे बाळकडू मिळाल्याने जीवनात यशस्वी झालेल्या नागरिकांना संस्कार केंद्रातील दिवस अजूनही आठवतात. यश मिळविण्यासाठी आवश्यक असलेले ध्यैर्य, चिकाटी, सहनशीलता याच संस्कार केंद्राने शिकविले. संस्कार केंद्रामुळे आपण प्रगती साधली, मात्र संस्कार केंद्राची अवदशा बघून त्यांच्या डोळे पाणावतात.
संस्कार केंद्रात दारूमुक्तीचेही धडे दिले जात होते. या केंद्रामुळे शेकडो नागरिकांनी दारूला रामराम ठोकून उद्ध्वस्त होणारे आयुष्य वाचविले.