जळाऊ लाकडांसाठी अंत्ययात्रा पोहोचली वन विभागाच्या कार्यालयात

By admin | Published: May 7, 2017 01:16 AM2017-05-07T01:16:38+5:302017-05-07T01:16:38+5:30

चामोर्शी येथील आमदार वास्तव्य करीत असलेल्या वाडार्तील वृध्द महिला जनाबाई सोमाजी चंदनखेडे हिचे कर्करोगाने वयाच्या ६५ व्या वर्षी शुक्रवारी रात्री निधन झाले.

At the office of the forest department reached the end of the funeral | जळाऊ लाकडांसाठी अंत्ययात्रा पोहोचली वन विभागाच्या कार्यालयात

जळाऊ लाकडांसाठी अंत्ययात्रा पोहोचली वन विभागाच्या कार्यालयात

Next

चामोर्शी येथील प्रकार : जळाऊ लाकडे उपलब्ध नसल्याने नागरिक त्रस्त; आमदारांची वनमंत्र्यांकडे तक्रार; वन विभागात खळबळ
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : चामोर्शी येथील आमदार वास्तव्य करीत असलेल्या वाडार्तील वृध्द महिला जनाबाई सोमाजी चंदनखेडे हिचे कर्करोगाने वयाच्या ६५ व्या वर्षी शुक्रवारी रात्री निधन झाले. तिच्या अंत्यविधीसाठी जळाऊ लाकडाची आवश्यकता होती. मात्र वनविभागाच्या कार्यालयात जळाऊ लाकूड उपलब्ध नव्हते. याबाबीची माहिती आ. डॉ. होळी यांना दिली असता, आ. डॉ. होळी यांनी कार्यकर्त्यांसह मृतक जनाबाई चंदनखेडे यांच्या घरी पोहोचले. जनतेचा आक्रोश पाहून जनाबाई हिची अंत्ययात्रा सरळ वनपरिक्षेत्र कार्यालयात आमदारांच्या नेतृत्वात पोहोचली. यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलाश धोंडणे कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे जनतेचा रोष अधिकच वाढला. त्यांनी अंत्यविधी कार्यालयातच पार पाडण्याचा निर्णय घेतला. यामुळे एकच खळबळ माजली.
२५ हजार लोकसंख्या असलेल्या चामोर्शी शहरातील वन परिक्षेत्र कार्यालयात अनेक महिन्यांपासून जळाऊ लाकडांचा तुटवडा निर्माण झाला आहे. आ. डॉ. देवराव होळी यांच्यासह चामोशीर्तील अनेक नागरिकांनी तसेच पंचायत समितीमध्ये झालेल्या व १ मेच्या ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना जळाऊ बिट उपलब्ध करून देण्याची सूचना वारंवार देण्यात आल्या. मात्र याकडे ज्वलंत समस्येकडे वनविभागाने दुर्लक्ष केल्याने जनतेचा व आमदारांच्या रोषाचा बांध फुटला. अखेर चामोर्शी येथील हनुमाननगरमध्ये राहणारी अत्यंत गरीब असलेल्या महिलेचे निधन झाल्याने अंत्यविधीसाठी जळाऊ लाकूड उपलब्ध नव्हते. यावेळी आ. डॉ. होळी यांच्या पुढाकाराने अंत्ययात्रा थेट वनपरिक्षेत्र कार्यालयात पोहोचली. याच परिसरात नातेवाईकांनी अंत्यविधी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान आ. डॉ. होळी यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सी. सी. एफ. गडचिरोली, ए.सी. एफ. आलापल्ली, पी. सी. सी. एफ नागपूर यांना संपर्क साधल्यानंतर महाराष्ट्राचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संवाद साधून घटनेची माहिती दिली. ना. मुनगंटीवार यांनी त्वरित लाकडे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी आ. डॉ. देवराव होळी, भाजयुमोचे स्वप्नील वरघंटे, तालुका अध्यक्ष दिलीप चलाख, जिल्हा सचिव रामेश्वर सेलूकर, माजी सभापती रवी बोमनवार, जैराम चलाख, नरेश अल्सावार, माणिक कोहळे, निरज रामानुजवार, रमेश अधिकारी, नायब तहसीलदार एस. आर. तनगुलवार, क्षेत्रसहाय्यक आर. डी. तोकला, पोलिस निरीक्षक किरण अवचर, पोलिस उपनिरीक्षक मल्हार थोरात, उपनिरीक्षक निशा खोब्रागडे व नागरिक उपस्थित होते. तडजोडीनंतर सदर महिलेचा अंत्यविधी चामोर्शी येथील वैनगंगेच्या लोंढोली नदीघाटावर करण्यात आला. यावेळी चामोर्शी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे यादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडलेली नाही.

वनपरिक्षेत्र अधिकारी यांना निलंबित करा -आ. डॉ. होळी
आ. डॉ. देवराव होळी यांनी चामोर्शी येथील वनविभागात जळाऊ लाकडे उपलब्ध नसल्याने ती उपलब्ध करून देण्याच्या वारंवार सूचना केल्या होत्या. मात्र याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे चामोर्शी व घोटचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आ. डॉ. देवराव होळी यांनी केली.

वरिष्ठ कार्यालय व घोट येथे जळाऊ लाकडू व बांबूकरीता तोंडी व पत्राव्दारे वारंवार माहिती दिली. तसेच याबाबत खासदार व आमदारांना लेखी पत्राव्दारे कळविले आहे. तसेच उपवनसंरक्षक आलापल्ली वनविभाग आलापल्ली यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी घोट यांना चामोर्शी येथे बिट पुरवठा करण्यासंदर्भात २६ एप्रिल २०१७ ला पत्राव्दारे कळविले असता, वनपरिक्षेत्र अधिकारी घोट यांनी आजपावेतो कुठलाही बिट उपलब्ध करून दिलेला नाही.
- कैलाश धोंडणे, वन परिक्षेत्राधिकारी चामोर्शी

चामोर्शी येथे ८० बिटांचा व ८ हजार बांबूचा पुरवठा करण्यात आलेला होता. घोट येथील डेपोमध्ये बिटांची उपलब्धता नसल्याने जळाऊ बिटांचा पुरवठा सद्यस्थितीत बंद आहे. बिटांची उपलब्धता झाल्यास तत्काळ बिटांचा पुरवठा करण्यात येईल.
- शेखर तनपुरे, वन परिक्षेत्राधिकारी घोट

 

Web Title: At the office of the forest department reached the end of the funeral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.