मागास गडचिरोली जिल्ह्यातील तुषार झाला सैन्यदलात अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2018 10:18 PM2018-12-17T22:18:58+5:302018-12-17T22:19:16+5:30
गडचिरोलीसारख्या शैक्षणिक सुविधांचा अभाव असलेल्या जिल्ह्यात शालेय शिक्षण घेतलेल्या पण उच्च ध्येय ठेवलेल्या तुषार सुरेश फाले या युवकाने अत्यंत कठीण अशी परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय सैन्यदलात अधिकाऱ्याचा होण्याचा बहुमान मिळवला आहे. डेहराडून येथे नुकत्याच झालेल्या दीक्षांत परेडमध्ये त्याला ‘लेफ्टनंट’ म्हणून नियुक्ती देण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोलीसारख्या शैक्षणिक सुविधांचा अभाव असलेल्या जिल्ह्यात शालेय शिक्षण घेतलेल्या पण उच्च ध्येय ठेवलेल्या तुषार सुरेश फाले या युवकाने अत्यंत कठीण अशी परीक्षा उत्तीर्ण करून भारतीय सैन्यदलात अधिकाऱ्याचा होण्याचा बहुमान मिळवला आहे. डेहराडून येथे नुकत्याच झालेल्या दीक्षांत परेडमध्ये त्याला ‘लेफ्टनंट’ म्हणून नियुक्ती देण्यात आली.
गडचिरोली येथील रहिवासी सुरेश व अर्चना फाले यांचा सुपूत्र असलेल्या तुषारने आपले शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर नागपूर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतले. बीईच्या अंतिम वर्षाला असताना (२०१६) त्याने संघ लोकसेवा आयोगाची कम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेसची परीक्षा दिली. बीई अभ्यासक्रम प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केल्यानंतर कम्बाईंड डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये पहिल्याच प्रयत्नात तुषारने यश संपादन केले. मुळातच साहसी स्वभाव असलेल्या तुषारने देशसेवेच्या इच्छेने इंडियन मिल्ट्री अॅकॅडमीमधील दीड वर्षाचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. त्यामुळे भारतीय सैन्यदलाने त्याला लेफ्टनंदपदी नियुक्ती दिली.
अभियांत्रिकी पदवी प्राप्त केल्यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांच्या मागे न जाता देशसेवेसाठी योगदान देण्यासाठी पुढाकार घेण्याचा तुषारचा निर्णय जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.