अधिकारी व कर्मचारी संपावर जाणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2017 12:51 AM2017-01-14T00:51:54+5:302017-01-14T00:51:54+5:30
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी...
तीन दिवस कामबंद : राजपत्रित अधिकारी महासंघाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
गडचिरोली : अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या वतीने १८ ते २० जानेवारी २०१७ दरम्यान तीन दिवस संप पुकारण्यात येणार आहे. या संदर्भात प्रलंबित मागण्यांचे निवेदन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक यांना देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत राज्य शासनाच्या वेळकाढू धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. या बैठकीला १५० प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत तीन दिवस संप पुकारण्याचा निर्णय घेण्यात आला. या संपाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून देण्यात आली.
निवेदन देताना जिल्हा समन्वय समितीचे दुर्वेश सोनवाने, महेश आव्हाड, जिल्हा समान्वय समितीचे अध्यक्ष विजय मुळीक, सचिव डॉ. प्रशांत आखाडे, कार्याध्यक्ष शालिक पडघन, मनमोहन चलाख आदी उपस्थित होते. १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग तत्काळ लागू करावा, पाच दिवसांचा आठवडा करून सेवा निवृत्तीचे वय ६० करावे, दोन वर्षाची बालसंगोपन रजा करावी, राज्यातही केंद्राप्रमाणे १०, २० व ३० वर्षांच्या सेवा कालावधीनंतर त्रिसदस्यीय ‘सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना’ लागू करावी, रिक्तपदे भरण्यात यावी, लोकप्रतिनिधींच्या दबावातून कोणत्याही अधिकाऱ्याची बदली करू नये, कंत्राटी पद्धतीने तुटपुंज्या पगारावर चाललेले शोषण बंद करून कायमस्वरूपी त्याची नियुक्ती करण्यात यावी, चक्राकार विभागवार बदली पद्धतीतून महिला कर्मचारी व अधिकाऱ्यांना वगळण्यात यावे, पती-पत्नी एकत्रिकरणासाठी एक वर्ष थांबण्याची अव्यवहार अट काढून टाकण्यात यावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. १८ ते २० जानेवारी दरम्यान होणाऱ्या संपामध्ये अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेने केले आहे.