अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा
By admin | Published: September 9, 2016 01:19 AM2016-09-09T01:19:32+5:302016-09-09T01:19:32+5:30
विकासाच्या संदर्भात अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे.
क्रिष्णा गजबे यांचे प्रतिपादन : आरमोरी पं.स.च्या आमसभेत वादळी चर्चा
आरमोरी : विकासाच्या संदर्भात अधिकारी, पदाधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये समन्वय असणे गरजेचे आहे. या समन्वयातूनच समस्या उद्भवणारे प्रश्न मार्गी लावता येतात. सरपंच व गावातील जबाबदार पदाधिकाऱ्यांनी गावाच्या समस्या व विकासा संदर्भातील प्रश्न अधिकारी व पदाधिकारी यांच्या लक्षात आणून देऊन या संदर्भात पाठपुरावा करावा. विकासकामांच्या संदर्भात अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केलेली दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा आमदार क्रिष्णा गजबे यांनी वार्षिक आमसभेत दिला.
आरमोरी पंचायत समितीची सन २०१५-१६ व सन २०१६-१७ ची वार्षिक आमसभा स्थानिक राजीव भवनाच्या सभागृहात आमदार क्रिष्णा गजबे यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी पार पडली. आमसभेला आरमोरी पंचायत समितीचे सभापती सविता भोयर, जि.प. सदस्या लक्ष्मी मने, कुसूम रणदिवे, पुनम गुरनुले, तहसीलदार मनोहर वलथरे, संवर्ग विकास अधिकारी ए. डी. सजनपवार, सहायक संवर्ग विकास अधिकारी मनोहर निमजे, पंचायत समिती सदस्य नानू चुधरी, सचिन महाजन, भारत बावणथडे, नंदू पट्टेवार, बबलू ताडाम यांच्यासह पंचायत समिती सदस्य व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. आमसभेला गैरहजर असतील, त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर मागील आमसभेचे अहवाल वाचन सहायक संवर्ग विकास अधिकारी मनोहर निमजे यांनी केले. मागील सभेत उपस्थित झालेले मुद्दे निकाली लागले किंवा नाही याचाही आढावा घेण्यात आला. वार्षिक आमसभेत विविध मुद्यांवर वादळी चर्चा झाली. आरमोरी क्रीडा संकुलाची दुरावस्थेची चौकशी करण्याचे निर्देश दिले. मुदतबाह्य हॅन्डवॉश प्रकरणी गट शिक्षणाधिकारी परसा यांच्या वेतनातून हॅन्डवॉश बॉटलची रक्कम वसूल करावी, वघाळा, सायगाव येथील गैरहजर शिक्षकांवर कारवाई करावी, शिक्षण विभागाकडे गट शिक्षणाधिकारी परसा यांचे दुर्लक्ष होत असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याचा ठराव घेतला. वघाळा गावची सिमांकन, शाळा व अंगणवाडी इमारतींचे निर्लेखन, निकृष्ट आहार, रेंगाळलेली कामे याबाबत ठराव घेऊन कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. (वार्ताहर)